Mira Bhayandar Traffic : ... अखेर वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र उपायुक्त पद

शासनाची मंजुरी; आ. नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी
Mira Bhayandar Traffic
Mira Bhayandar Trafficpudhari photo
Published on: 
Updated on: 

भाईंदर : राजू काळे

मिरा-भाईंदर शहरातील वाढत्या लोकसंख्येसह वाहनांची संख्या सतत वाढत असल्याने दिवसेंदिवस शहरातील वाहतूक समस्या गंभीर होत चालली आहे. ही वाहतूक कोंडी लक्षात घेता, वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आ. नरेंद्र मेहता यांनी गतवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मिरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र पोलीस उपायुक्त पद निर्मितीची मागणी केली होती. तब्बल एक वर्षानंतर शासनाने त्याला मंजुरी देत ३ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

शहराच्या वाढत्या शहरीकरणाच्या तुलनेत वाहतूक व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्याची आवश्यकता असल्याचे आ. मेहता यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्या तुलनेत शहरात रस्त्यांची अपुरी संख्या तर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच काही रस्ते बहुतांशी ठिकाणी अरुंद तर त्यातीलच काही रस्ते फेरीवाल्यांकडून व्यापल्याने वाहतूक कोंडीच्या समस्या डोके वर काढत आहे.

Mira Bhayandar Traffic
Thane Firecracker Testing : ऑल आऊट ५००० फटाक्यांचा आवाज सर्वाधिक; १११.८ डेसिबलची नोंद!

तसेच शहरात वाहनांच्या पार्किंगचा विषय गंभीर असल्याने अनेक वाहनचालक अवैधरीत्या रस्त्यांवर वाहने पार्किंग करीत असल्याने सुरळीत वाहतुकीला त्याचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक महत्वाचे ठरल्याने मेहता यांनी त्याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांकडे शहरातील वाहतुकीच्या नियोजनार्थ स्थानिक वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र वाहतूक उपायुक्तांचे पद निर्माण करण्याची मागणी गतवर्षी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेऊन पोलीस महासंचालकांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार ३ नोव्हेंबर रोजी शासनाकडून स्वतंत्र पोलीस उपायुक्त पदाच्या निर्मितीला मंजुरी देण्यात येऊन तसा शासन निर्णय याच दिवशी जारी केला. या शासन निर्णयामुळे मिरा-भाईंदर परिसरातील वाहतूकीचे नियोजन, वाहतूक कोंडीवरील उपाययोजना, वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी तसेच अपघात प्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यास अधिक बळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेला स्वतंत्र नेतृत्व मिळणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Mira Bhayandar Traffic
Thane Agriculture News : बियाणे बोगस निघाले; शेतकऱ्याने पेटवले अधिकाऱ्यांसमोर ६ एकराचे वावर

या निर्णयाबद्दल आ. नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानून मिरा-भाईंदरच्या विकासासह नागरिकांच्या सुविधांसाठी शासन कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त केली आहे. एकंदरीतच स्वतंत्र पोलीस उपायुक्त पदाच्या निर्मितीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थापनात महत्वाच्या सुधारणा होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे आ. मेहता यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.