

भाईंदर : मिरा-भाईंदर शहराला सूर्या प्रकल्पातून २१८ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह भाजप आ. नरेंद्र मेहता सतत पाठपुरावा करीत आहेत. मात्र सरनाईक यांनी सूर्या प्रकल्पातील पाणी मिरा-भाईंदरसह ठाण्याला मिळण्याबाबत १३ नोव्हेंबर रोजी बैठक बोलवली होती. त्यावर आक्रमक झालेले भाजप आ. नरेंद्र मेहता यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत मिरा-भाईंदर शहराला सूर्या प्रकल्पाच्या मंजूर कोट्यातील पाण्याचा एकही थेंब ठाण्याला देणार नसल्याचा इशारा दिला आहे.
मिरा-भाईंदरची लोकसंख्या सुमारे १४ लाखांवर पोहोचली असून या लोकसंख्येला शासकीय कोट्यातून एकूण २११ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. यातील १२५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा एमआयडीसीकडून व ८६ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा स्टेम प्राधिकरणाकडून केला जातो.
असे असताना शहराला केवळ २०० दशलक्ष लीटर इतकाच पाणीपुरवठा शहराला उपलब्ध होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत होणारा हा पाणीपुरवठा अपुरा असल्याने शहरात वर्षभर पाण्याची समस्या उद्भवते. यामुळे लोकांना ४० ते ४५ तासांच्या अंतराने तसेच कमी दाबाने पाणी उपलब्ध होते. त्यातच अल-निनोच्या पार्श्वभूमीवर शहराला १० टक्के पाणीकपात लागू केल्याने शहरात पाण्याची समस्या अधिकच बिकट झाली आहे.
परिणामी शहरात तब्बल ७२ तासांनंतर म्हणजेच ३ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने यात संपूर्ण महापालिकेची पाणी वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्याने लोकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
यामुळे राज्य सरकारने २०१२ मध्ये शहराला एमआयडीसी कोट्यातून १०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मंजूर केला. हा पाणीपुरवठा शहराला पुढील ४ वर्षांपर्यंत उपलब्ध झाला नाही. यानंतर राज्य सरकारने २०१६ मध्ये पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणातून मिरा-भाईंदरला ११८ दशलक्ष लीटर पाणी मंजूर केले. यात २०१२ मध्ये मंजूर १०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठ्याचा समावेश करून शहराला एकूण २१८ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले.
ही पाणीपुरवठा योजना एमएमआरडीएकडून राबविण्यात येत असून त्याचे भुमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २०१६ मध्येच करण्यात आले. योजना पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ३६ महिन्यांची मुदत संपुष्टात येऊन योजना पूर्ण होण्यास १२० महिन्यांवर कालावधी लागला आहे. तरी देखील ही योजना अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. योजना लवकर पूर्ण होऊन शहराला तत्काळ पाणीपुरवठा व्हावा, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व भाजप आ. नरेंद्र मेहता यांनी सतत योजनेचा आढावा घेण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १३ नोव्हेंबर रोजी सूर्या प्रकल्पातील पाणी मिरा-भाईंदरला उपलब्ध होण्यासह ठाण्याला उर्वरित पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनाबाबत बैठक बोलवली होती. यावर आ. मेहता आक्रमक होत त्यांनी महापौर दलनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यात त्यांनी सूर्या प्रकल्पातून शहराला उपलब्ध पाणीपुरवठ्यातून पाण्याचा एक थेंबही ठाण्याला देणार नसल्याचा इशारा दिला.
सूर्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात
सुर्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे पाणी मिरा-भाईंदरकरांना ३१ जानेवारीपर्यंत मिळून त्यांची तहान भागविली जाणार असल्याचा दावा मेहता यांनी केला आहे. यासाठी कामाचा सतत आढावा घेतला जात असून एकीकडे लोकं पाण्यासाठी त्रस्त असताना अशा बिकट परिस्थितीत मिरा-भाईंदर शहराच्या हक्काचे पाणी ठाणे शहराकडे वळविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे.
हक्काचे पाणी न देण्याचा निर्धार
दरम्यान मीरा-भाईंदर शहराच्या हक्काचे पाणी कोणत्याही परिस्थितीत ठाणे शहराला दिले जाणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. पाणी पळवण्याचा हा कट कदापि यशस्वी होऊ देणार नाही. तसेच मिरा-भाईंदरकरांना पाण्यासाठी तहानलेले ठेवून जर येथील पाणी पळविण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर भाजप रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. प्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देण्यात येईल. यात जीव गेला तरी चालेल, पण शहराच्या हक्काचे पाणी कोणालाही देणार नसल्याचा इशारा यावेळी आमदार नरेंद्र मेहता यांनी दिला आहे.