

Mira Bhayandar Police Commissioner Madhukar Pandey Transferred
मिरा रोड : मिरा भाईंदरमधील मराठी स्वाभिमान मोर्चाला परवानगी नाकारल्याने अडचणीत आलेले पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बुधवारी संध्याकाळी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी आता निकेत कौशिक यांची मिरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवारी राज्याच्या गृह विभागाने शासन आदेश जारी करत मिरा भाईंदरचे विद्यमान आयुक्त मधुकर पांडे यांची अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) येथे बदली केली. त्यांच्या जागी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालकपदावर असलेले निकेत कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली.
मधुकर पांडेंची बदली का करण्यात आली?
मिरा भाईंदरमध्ये अमराठी दुकानदाराला मनसेने मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून मारहाण केल्याच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयावर 3 जुलै रोजी मोर्चा काढला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मराठी भाषिकांनी मंगळवारी (8 जुलै रोजी) मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात मनसेसह मराठी एकीकरण समिती, शिवसेना उबाठा आदी पक्षाचे नेते- कार्यकर्ते सहभागी होणार होते.
मंगळवारी सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेलपासून हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केल होते. पोलिसांच्या या दुजाभावावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
एकीकडे अमराठी भाषिकांचा विनापरवानगी मोर्चा निघाला तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. तर दुसरीकडे मराठी भाषिकांच्या परवानगी नाकारण्यात आली. इतकंच नव्हे मोर्चास्थळी काही महिलांनाही पोलिसांनी विनाकारण व्हॅनमध्ये डांबत असल्याचे आरोप झाले होते. या महिला मोर्चात सहभागी होण्यासाठी आलो नाही असं सांगत होत्या तरीही पोलिसांनी बळाचा वापर केला.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया देत थेट देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार दिली होती. फडणवीसांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त करत पोलीस महासंचालकांकडून अहवाल मागवला होता. शेवटी बुधवारी मधुकर पांडेंची उचलबांगडी करण्यात आली.