भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या मौजे-काशी येथील आरक्षण क्रमांक ३२० च्या जागेत स्थानिक बांधकाम माफियांनी तब्बल १०५ अनधिकृत झोपड्या बांधल्या. त्यावर पालिकेकडून शुक्रवारी तोडक कारवाई करून सुमारे ५० झोपड्याच जमिनदोस्त करण्यात आल्या आहेत.
येथील काशीगांव पोलीस ठाण्यालगत पालिकेच्या आरक्षण क्र. ३२० वरील जागेचा टिडीआर जागा मालकाने घेतल्यानंतर ती जागा पालिकेने ताब्यात घेतली. या जागेवर पालिकेने बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपातील संक्रमण शिबिराच्या माध्यमातून एकूण २१६ खोल्या बांधल्या. तर उर्वरित जागा पालिकेने मोकळी सोडली. त्याचा गैरफायदा घेत स्थानिक बांधकाम माफियांनी त्या मोकळ्या जागेवर सुरुवातीला सुमारे २० हुन अधिक अनधिकृत झोपड्या बांधल्या. पुढे या झोपड्यांची संख्या वाढून तब्बल १०५ झोपड्या बांधण्यात आल्या. कालांतराने कच्च्या झोपड्यांचे पक्क्या बांधकामात रूपांतर करण्यात आले.
या झोपड्या बीएसयूपी योजनेतील काही बोगस लाभाध्यर्थ्यांनी स्थानिक बांधकाम माफियांच्या माध्यमातून बांधल्याचे बोलले जात आहे. या झोपड्यांच्या माध्यमातून त्यांनी बीएसयूपी योजनेतील मूळ लाभार्थी असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. त्या अनुषांगानेच पालिकेच्या आरक्षित तसेच संक्रमण शिबिरालगत अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्याची तक्रार स्थानिक रहिवाशी निलेश फापाळे यांनी शहर अभियंता दीपक खांबित यांच्याकडे केली होती.
तत्पूर्वी तक्रारदाराने प्रभाग अधिकाऱ्याकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदाराने शहर अभियंत्याकडे तक्रार केल्यानंतर शहर अभियंत्यांनी कार्यकारी अभियंता नितीन मुकणे यांना कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश दिले. कार्यकारी अभियंत्यांनी नुकतेच प्रभाग अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करीत संक्रमण शिबिरातील २१६ खोल्यांव्यतिरीक्त इतर अनधिकृत बांधकामे हटविण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार प्रभाग अधिकारी स्वप्निल सावंत यांच्या नियंत्रणाखालील पथकाने शुक्रवारी त्या अनधिकृत झोपड्या वजा पक्क्या खोल्यांच्या बांधकामांवर तोडक कारवाई करून एकूण १०५ पैकी सुमारे ५० झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
१०५ खोल्यांचे बांधकाम काशिमीरा परिसरात स्थानिक
बांधकाम माफियांकडून पालिकेच्या आरक्षित जागेत एकूण १०५ खोल्यांचे बांधकाम केले. त्यातील काही खोल्या सुमारे ४ हजार रुपये प्रती महिना भाडेतत्वावर देण्यात आल्या तर काही खोल्या गरीब व गरजूंना सुमारे ९ ते १० लाख रुपयांना विकण्यात आल्याचे बोलले जात आहे.