MBMC Meeting Conflict | मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेतील राड्याचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना भाजप नगरसेवकांकडून मारहाण

पत्रकारांचे मोबाईल हिसकावून आपटले; दोषी नगरसेवकांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाईची मागणी
Mira Bhayandar BJP Corporators Journalists Assault
गोंधळाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाच भाजपच्या नगरसेवकांकडून मारहाण Pudhari
Published on: 
Updated on: 

Mira Bhayandar BJP Corporators Journalists Assault

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेदरम्यान प्रेक्षक गॅलरीत चित्रीकरण केल्याच्या संशयावरून झालेल्या गोंधळाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाच भाजपच्या नगरसेवकांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वेळी पत्रकारांचे मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटण्यात आल्याचेही सांगण्यात आले. या घटनेमुळे महापालिका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध करत संबंधित नगरसेवकांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकारांनी केली.

शुक्रवारी महापालिकेच्या महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रेक्षक गॅलरीत काही जण महासभेचे चित्रीकरण करत असल्याचा संशय महापौर डिंपल मेहता यांना आला. त्यांनी संबंधितांना चित्रीकरण न करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यानंतरही चित्रीकरण सुरू असल्याचे लक्षात आल्याने महापौरांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुरक्षारक्षक आणि पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले.

Mira Bhayandar BJP Corporators Journalists Assault
Thane Crime : नशेच्या विदेशी गोळ्या, 2 किलो हायब्रीड गांजासह एक अटकेत

महासभेचे थेट प्रक्षेपण आणि चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकारातून या संदर्भातील माहिती घेतली होती. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी महासभेचे चित्रीकरण सुरू केल्याने हा वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे.

प्रेक्षक गॅलरीत धक्काबुक्की; चपला फेकल्याचा आरोप

चित्रीकरणाच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच भाजपच्या नगरसेविका शानु गोहिल, रुपाली शिंदे-मोदी, अ‍ॅड. श्रद्धा कदम, वर्षा भानुशाली, दीपिका अरोरा, नगरसेवक नवीन सिंग, अ‍ॅड. तरुण शर्मा, संजय थरथरे, विशाल पाटील, भाजप कार्यकर्ता प्रियेश शहा यांच्यासह अन्य नगरसेवक आणि नगरसेविकांनी सभागृहातून प्रेक्षक गॅलरीत प्रवेश केल्याचा आरोप आहे.

तेथे चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तींना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, नगरसेविका रुपाली शिंदे-मोदी यांनी संबंधितांच्या दिशेने चपला फेकल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकारामुळे गॅलरीतील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. या संपूर्ण घटनेत नगरसेवक अ‍ॅड. तरुण शर्मा सक्रिय असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Mira Bhayandar BJP Corporators Journalists Assault
Thane ZP Schools Low Student Enrollment : ठाणे जि.प. शाळांमध्ये चिंताजनक चित्र; ९३ शाळांत ५ पेक्षा कमी पटसंख्या

पत्रकारांचे मोबाईल हिसकावले; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या गोंधळाचे वृत्तांकन करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पत्रकारांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. नगरसेविका शानु गोहिल यांनी ‘लोकसत्ता’च्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटल्याचे सांगण्यात आले. इतर काही नगरसेवकांनीही पत्रकारांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तींना आणि एका स्थानिक पत्रकाराला ताब्यात घेऊन भाईंदर पोलीस ठाण्यात नेले. या कारवाईवरून पोलिसांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. याच घटनेदरम्यान नगरसेविका रुपाली शिंदे-मोदी यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रकारानंतरही संबंधित नगरसेवकांवर कारवाई होत नसल्याचा आरोप पत्रकारांनी केला.

पत्रकारांचा सभागृहाच्या पायऱ्यांवर ठिय्या

पत्रकारांवरील कथित हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी महापालिका सभागृहाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनीही पत्रकारांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांच्यासोबत ठिय्या मांडला.

या आंदोलनाची दखल घेत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी गटनेते हसमुख गेहलोत आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांना पत्रकारांची भेट घेऊन संवाद साधण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन पत्रकारांशी चर्चा केली. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पत्रकारावर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर संबंधित पत्रकाराला पोलिसांच्या ताब्यातून सोडविण्यात आले.

मात्र, केवळ आश्वासन पुरेसे नसून मारहाण करणाऱ्या नगरसेवकांनी जाहीर माफी मागावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांनी कायम ठेवली.

Mira Bhayandar BJP Corporators Journalists Assault
Thane Bribery Case : ३ हजाराची लाच मागणाऱ्या शिधावाटप निरीक्षकाला १ वर्षाचा सक्त कारावास

प्रताप सरनाईक यांच्याकडून हल्ल्याचा निषेध

या घटनेवर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनीही प्रतिक्रिया दिली. पत्रकारांवर हल्ला करणे ही लोकशाहीची हत्या असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भाजपला बहुमत मिळाले म्हणून कायदा आणि सुव्यवस्था हातात घेता येणार नाही, असे सांगत त्यांनी या प्रकाराचा निषेध केला. पोलिसांनी घटनेतील सत्यता तपासून दोषींवर कठोर कारवाई करणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महापालिकेच्या महासभेदरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे लोकप्रतिनिधींचे वर्तन, पत्रकारांची सुरक्षितता आणि पोलिसांची निष्पक्ष भूमिका यांबाबत चर्चा सुरू झाली आहे. पत्रकारांवरील कथित हल्ल्याप्रकरणी संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news