

-उमेश जोशी, मुरबाड
Thane Murbad Minor Attack Teacher Case: ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील शिवळे गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. केवळ तेरा वर्षांच्या मुलाने एका शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला केल्याची ही घटना असून, यामुळे कायदा-सुव्यवस्थेसोबतच समाजातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय इसामे नावाचा 13 वर्षीय मुलगा चोरीच्या उद्देशाने शिक्षिका सायली इसामे यांच्या घरात शिरला. घरातील कपाट फोडण्याचा तो प्रयत्न करत असताना सायली इसामे यांनी त्याला विरोध केला.
यावेळी आरोपी मुलाने संतापाच्या भरात धारदार शस्त्राने शिक्षिकेवर वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात सायली इसामे गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर मान आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, आसपासच्या नागरिकांनी तत्परता दाखवत त्याला पकडले आणि मुरबाड पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जखमी शिक्षिकेला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलाने इतक्या गंभीर प्रकाराचा गुन्हा केल्यामुळे या प्रकरणाची चौकशी अधिक संवेदनशीलपणे केली जात आहे. आरोपीच्या कुटुंबीयांची पार्श्वभूमी, त्याच्या वागणुकीमागची कारणे आणि गुन्ह्याच्या परिस्थितीचा तपशील पोलिस तपासत आहेत.
अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारी गुन्हेगारी प्रवृत्ती, घरातील वातावरण, शिक्षणातील बदल आणि सामाजिक प्रभाव या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज यामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.