

शहापूर : आदिवासी विकास महामंडळातील बोगस भात खरेदीमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या घोळानंतर उघडकीस आलेल्या सुमारे 80 लाखाच्या बारदान घोटाळ्यावर आठ महिन्यांपूर्वी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चौकशीत मोठ्या प्रमाणात विसंगती दिसत असून तक्रारी प्राप्त होत असल्याने या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे.
2019-20 व 20-21 मध्ये महामंडळाकडे बारदान उपलब्ध नसल्याने शेतकर्यांकडून बारदानासह भात खरेदी करण्यात आला होता. सदर बारदान शेतकर्यांना परत करण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत भिवंडी येथील पुरवठादाराला नियुक्त करण्यात आले होते. त्यानुसार शहापूर व मुरबाड तालुक्यातील दुधनोली, अघई, मढ - अंबर्जे व खर्डी येथील केंद्रांतर्गत येणार्या गोदामात सुमारे एक कोटी दहा लाख किमतीचे 3 लाख 38 हजार 447 नग उतरविण्यात आले होते. यामध्ये अपहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नियुक्त केलेल्या चौकशीमध्ये 80 लाख 85 हजाराचे दोन लाख 47 हजार 937 नग गायब झाल्याचे निष्पन्न झाले होते.
या संबंधित दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई होणे क्रमप्राप्त असताना फक्त एका प्रतवारीकारावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान प्रत्यक्ष दोषी अधिकारी यातून मोकाट सुटले असल्याचा आरोप तक्रारदारांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात पुन्हा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महामंडळाच्या अधिकार्यांची झोप उडाली असून पुन्हा चौकशी समिती नेमण्यात आली आहे.