

रनेवाळी (ठाणे) : डोंबिवली-अंबरनाथ महामार्गावरील नेवाळी नंतर आता खोणी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ मिनी डम्पिंग तयार झाला आहे. आजूबाजूच्या परिसरातील दुकानांमधून निघणारा वेस्टेज थेट महामार्गाच्या कडेला टाकण्याची काम सुरु झाली आहेत.
त्यामुळे परिसरातील नागरिकांसह महामार्गवरुन प्रवास करणार्या वाहनचालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिले जात आहेत. परंतु नेवाळीची झालेली परीस्थिती पाहता आता खोणी देखील कचरा प्रश्नी त्याच दिशेनं पाऊल टाकत असल्याचे चित्र समोर येत आहे.
कल्याण ग्रामीण भागातील खोणी गावाच्या प्रवेश द्वाराजवळ कचर्याचे ढिगारे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. महामार्गाच्या कडेला असलेल्या या डंपिंग मुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना या कचर्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत देखील महामार्गाच्या कडेला जागोजागी मिनी डम्पिंग तयार झाले आहेत. त्यामुळे परिसरातील कचर्याच्या ढिगार्यांचे पसारे थेट महामार्गावर प्रवेश करत आहेत. कचरा मुक्त महामार्ग करताना नेवाळी ग्रामपंचायतीला मोठी कसरत करावी लागत आहे. त्यानंतर आता त्याच दिशेने खोणी ग्रामपंचायत पाऊल टाकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. खोणी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ निर्माण झालेल्या मिनी डम्पिंगमुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासन काय पाऊल उचलतय ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.