बाणेर: पाषाण परिसरात महापालिकेचे जिजाऊ क्रीडासंकुल (आयटीआय) हे एकमेव खेळाचे मैदान आहे. सध्या काही शाळांना सुट्या लागल्या असून, मुलांना खेळण्यासाठी मैदानांची आवश्यकता आहे. परंतु या मैदानात नागरिक तर कचरा व राडाराडा टाकतातच, पण महापालिका देखील या ठिकाणी कचरा टाकत असल्याचे या मैदान खेळणार्या खेळाडुंनी सांगितले.
सूस रोडवरील साई चौक परिसरात असलेले हे खेळाचे मैदान आहे, की डम्पिंग ग्राउंड, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या मैदानामध्ये झाडांच्या तोडलेल्या फांद्या व इतर राडाराडा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे.
मैदानाचा दरवाजा कायम उघडा असल्यामुळे बिनधास्तपणे कोणीही येऊन या ठिकाणी राडारोडा टाकून जात आहे. सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी परिसरातील युवकांना आणि लहान मुलांना खेळण्यासाठी हे एकमेव मैदान उपलब्ध आहे.
अलीकडेच परिसरातील युवकांनी एकत्र येत स्वखर्चाने संपूर्ण मैदान स्वच्छ करून व्यवस्थित केले होते. परंतु, महापालिकाने पुन्हा याला डम्पिंग ग्राउंड बनवत कचरा व राडारोडा टाकला आहे. वारंवार तक्रार करून देखील महापालिका दखल घेताना दिसत नाही.
ही बाब गंभीर असून, तातडीने मैदान साफ करून राडारोडा व कचरा टाकणे थांबवावे, अन्यथा हाच राडारोडा जवळील आरोग्य कोठी किंवा मनपा कार्यालयात नेऊन टाकण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिक समीर उत्तरकर यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देखील दिले आहे.