

भिवंडी (ठाणे) : सुमित घरत
जगभरात यंत्रमाग नगरी म्हणून ओळख असलेल्या यंत्रमाग कारखान्यातील खटखट हळूहळू कमी होत चालल्याचे चित्र कोरोना नंतरच्या काळापासून वारंवार समोर येत आहे. त्यातच यंत्रमाग कारखान्यातील सततची होणाऱ्या दगदगीने लूम कामगार गोदामात काम करणे पसंत करत असल्याचे उघड होत आहे. तसेच सद्यस्थितीतील वाढत्या महागाईनेही डोके वर काढले आहे. त्यामुळे या सर्वाचा एकत्रित फटका खानावळ व्यवसायास बसत असल्याने खानावळ मालकांचे नुकसान होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार २०२२ मध्ये खानावळीत १५ दिवस जेवणाचे १००० रुपये प्रति माणसाप्रमाणे आकारले जात होते. मात्र आता त्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली असून १५ दिवसांकरिता १२०० रुपये आकारले जात आहेत. यामुळेही कामगारांनी खानावळीच्या जेवणाकडे पाठ फिरवल्याचे खानावळ मालकांनी बोलताना सांगितले आहे. खानावळीच्या जेवणात १ भाजी, ५ - ६ चपाती आणि भाताचा समावेश आहे. तर ही खानावळ पद्धत पूर्णपणे उधारी मुळावर असून काही कामगार पैसे न देताच पलायन करत असल्याची माहिती खानावळ मालक सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे याचाही आर्थिक भुर्दंड मालकांना सोसावा लागत आहे.
प्रथमतः लूम व्यवसायाला महागाई, नोटबंदी, जीएसटी आणि वाढलेले वीज दर यामुळे आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. शिवाय कोरोनाच्या काळात यंत्रमाग व्यवसाय ठप्प होऊन लाखो कामगारांनी भिवंडीतून पलायन करून मूळ गावाचा रस्ता धरला होता, लॉक डाऊन नंतर पाहिजे तशी लूम व्यवसायात तेजी नसल्याने कित्येक खानावळी आजही बंद अवस्थेत आहेत. एकेकाळी २४ तास यंत्रमाग कारखान्यांची धडधड भिवंडी शहरात सुरु असायची, आता यंत्रमाग कारखान्यांची संख्या मर्यादित राहिल्याने त्याचा थेट परिणाम शहरातील शेकडो खानावळींवर झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सध्याच्या महागाईत खानावळ मालकांनी जेवणाचे दरही वाढवले त्यामुळे काही प्रमाणात खानावळ व्यवसायाला आर्थिक फटका बसला आहे. त्यातच परप्रांतीयांचे लग्नसराईचे कार्यक्रम नोव्हेंबर महिन्यात अधिकाधिक असल्याने कामगार या महिन्यात स्थलांतर करीत असल्यानेही खानावळ व्यवसायात मंदी येत असल्याचे समजते.
दरम्यान कामगारांच्या पुनरागमनाने या व्यवसायाला काहीसा दिलासा मिळतो. १९३० पासून हातमाग आणि यंत्रमाग कापड तयार करण्याच्या व्यवसायासाठी भिवंडी हे शहर प्रसिद्ध आहे. भारतातील एकूण २१ लाख यंत्रमागापैकी एकट्या भिवंडी शहरामध्ये सुमारे ७ लाख पावरलूम कार्यरत आहेत. देशामध्ये कापडनिर्मिती उद्योगाकरिता भिवंडी हे शहर पूर्वी प्रथम तर आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळेच भिवंडीला पावरलूम सिटी संबोधले जाते. या व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत निरनिराळ्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित व अस्थलांतरीत कामगार-मजूर हे भिवंडी शहरामध्ये रोजी रोटीसाठी येऊन राहत आहेत. परंतु गेल्या १० वर्षांतील शासनाच्या उदासीन आर्थिक धोरणांमुळे तसेच निर्यात घसरणीमुळे या कापडनिर्मितीच्या व्यवसायाचे फारच मोठे नुकसान झालेले आहे. परिणामी परप्रांतीय कामगारांनी स्थलांतरासह गोदामातील सुकर कामाचा पर्याय निवडल्याने खानावळ व्यवसायाला घरघर लागत चालल्याचे भिवंडी तालुक्यातून दिसून येत आहे.
यंत्रमाग कारखान्यातील आर्थिक मंदीमुळे व्यवसाय कमी झाला आहे. तर कारखान्यातील दगदगीपेक्षा पररप्रांतीय कामगार गोदामात काम करणे पसंत करत आहेत. त्यामुळे खानावळीत अगोदर पेक्षा ३० कामगार कमी झाल्याचा फरक पडला आहे. जेवणाची गुणवत्ता नेहमीच जपली जात आहे. खानावळ व्यवसाय पूर्णपणे उधारीवर चालवत असून काही कामगार पैसे न देताच पलायन करत असल्याने त्याचाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
बबलू शेख, काटई बाग, भिवंडी, ठाणे
खानावळीची परिस्थिती 'जैसे थे'
कुटुंबीयांपासून दूर येथे राहणारे ८ ते १० कामगार झोपडपट्टीमध्ये लहान खोलीत भाडयाने राहतात. या कामगारांसाठी येथे अनेक भिसी खानावळी चालतात. या खानावळीत मिळणाऱ्या अन्नपदार्थाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. तब्बल १८ वर्षांपूर्वी भिसी खानावळीतील जेवण जेवल्यामुळे कामगारांना विषबाधा झाली होती. या दुर्घटनेत १२० कामगारांचा बळी गेला होता. त्यानंतर भिसी खानावळीतील अन्नपदार्थाचा दर्जा, सुविधांबाबत अनेक चर्चा झाल्या होत्या. मात्र, आजही येथील भिसी-खानावळीची परिस्थिती 'जैसे थे' अशीच आहे.