

सोलापूर : जोडबसवण्णा चौक येथे रिकंडिशन टेरी टॉवेल रॅपियर लूम इलेक्ट्रॉनिक डॉबी सहित लूम मशीन विकत देतो म्हणून साडेतीन लाख रुपये घेत फसवणूक केल्याची घटना दहा एप्रिल 2024 ते 11 फेब्रुवारी 2025 दरम्यान घडली. याप्रकरणी श्रीकांत गणेश शेरला (वय 39, रा. जवाहर नगर, विडी घरकुल) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून राजू विनायक आडम, निकिता राजू आडम, शिवराज विनायक आडम आणि विनायक आडम (रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यात अधिक माहिती अशी की, यातील संशयित आरोपींनी त्यांच्या मालकीची रीकंडीशन इलेक्ट्रॉनिक रॅपियर मशीन विक्री करणार आहे, असे सांगून फिर्यादीकडून एकूण साडेतीन लाख रुपये घेऊन याबाबत मे. सविता टेक्स्टाईलकडून संशयित आरोपी राजू आडम याने 20 एप्रिल 2024 रोजी जिल्हा न्यायालय सोलापूर येथे पाचशे रुपये सरकारी नोटरीद्वारे करारनामा केला होता. परंतु फिर्यादीस कोणतेही साहित्य न देता फिर्यादीची फसवणूक केली. तसेच पैशाबाबत विचारणा केली असता यातील संशयित आरोपींनी शेरला यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.