

नेवाळी : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 14 गावांमधील उत्तरशीव गावातील गुरचरण जमिनीवर प्रस्तावित म्हाडा प्रकल्पासाठी बुधवारी करण्यात येणारी जमीन मोजणी अखेर स्थगित करण्यात आली. भूमिपुत्रांच्या तीव्र विरोधानंतर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी थेट म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत कारवाई थांबवण्यास भाग पाडले. त्यामुळे परिसरात मोठा दिलासा व्यक्त करण्यात आला आहे. मात्र जमीन जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा भूमिपुत्रांकडून देण्यात आला आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील उत्तरशीव गावात शासनाकडून म्हाडा प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यासाठी आवश्यक जमिनीची मोजणी करण्यासाठी अधिकारी दाखल झाले होते. यामध्ये ठाणे तहसीलदार यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी देखील होते. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीने जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत 14 गावांतील भूमिपुत्र मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
ठाणे व रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी एकजूट दाखवत प्रशासनाविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन उत्तरशीव येथे केले आहे. परिस्थिती तणावपूर्ण होत असताना आमदार राजेश मोरे यांनी तातडीने हस्तक्षेप करत म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी संजय जयस्वाल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. “भूमिपुत्रांचा विरोध असताना कोणत्याही परिस्थितीत सर्वेक्षण होऊ देणार नाही. नागरिकांशी चर्चा करून आवश्यक सुविधा देण्याबाबत निर्णय झाल्यानंतरच पुढील भूमिका घेतली जाईल,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
त्यांच्या मध्यस्थीनंतर प्रशासनाने मोजणीची कारवाई थांबवून माघार घेतली आहे.यासंदर्भात शासन स्तरावर लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीला म्हाडा,नवी मुंबई मनपा आयुक्त,लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे भूमिपुत्रांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनात माजी आमदार सुभाष भोईर, ठाणे मनपाचे नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेवक भरत भोईर, शशिकांत भोईर, प्रतीक्षा पाटील, सविता सांगळे, 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील,डायघर पंचक्रोशी समितीचे अध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भूमिपुत्र सहभागी झाले होते. 14 गावांमध्ये याआधी शासनाने दिलेल्या जमिनींवर म्हाडाचे प्रकल्प राबविले आहेत. यामध्ये भंडार्ली,गोठेघर यांचा समावेश आहे.
म्हाडाने लाभार्थ्यांना ताबाच दिला परंतु त्यांना कोणत्याही जीवनावश्यक सुविधा देखील शासन देऊ न शकल्याने त्यांनी उत्तरशीव येथे नाराजी व्यक्त केली आहे. 2023 साली तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली होती.
14 गाव नवी मुंबई महानगरपालिकेत आहेत. त्यामुळे आमची जमीन महानगरपालिकेच्या ताब्यात राहूंदेत आमच्या पुढील 14 गावातील सुविधा महापालिकेच्या माध्यमातून सुटतील.
प्रतीक्षा पाटील, नगरसेविका 14 गाव
आज निर्णय झालेला आहे आणि जमीन मोजणी थांबली आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी आमदार राजेश मोरे यांना उपस्थितांच्या समोर असा शब्द दिला आहे कि,आजची मोजणी थांबवली जाईल आणि आम्ही बैठकीला तयार आहोत. बैठक झाल्यानंतर पुढील दिशा ठरवू. परंतु आमचा,नागरिकांचा आणि 14 गावांचे असे ठाम म्हणणं आहे कि,एकही इंज जमीन हि कोणत्याही प्रकल्पाला द्यायची नाही.
लक्ष्मण पाटील, अध्यक्ष, 14 गाव सर्व पक्षीय विकास समिती