Prof. Dr. Vijay Khare | युद्धाच्या परिणामांसाठी जनतेने तयार राहावे

सरकारच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा : प्रा. डॉ. विजय खरे
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘पुढारी’कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत बोलताना सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे संरक्षण व सामरिक अभ्यासक प्रा. डॉ. विजय खरे. दुसर्‍या छायाचित्रात व्याख्यानाला झालेली गर्दी.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘पुढारी’कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत बोलताना सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे संरक्षण व सामरिक अभ्यासक प्रा. डॉ. विजय खरे. दुसर्‍या छायाचित्रात व्याख्यानाला झालेली गर्दी. (छाया : मिलन मकानदार)
Published on
Updated on

कोल्हापूर : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वैयक्तिक स्वार्थासाठी, तर इराण स्वत:च्या अस्तित्वासाठी युद्ध लढत आहे. यामुळे हे युद्ध आणखी वर्षभर चालण्याची शक्यता आहे. परिणामी, देशावर ऊर्जा संकट वाढणार आहे. आगामी काळात आपल्याला बिकट अवस्थेतून जावे लागणार असल्याने युद्धाच्या परिणामांसाठी जनतेने तयार राहावे, असे आवाहन करत सरकारने केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद द्यावा, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे संरक्षण व सामरिक अभ्यासक प्रा. डॉ. विजय खरे यांनी बुधवारी केले.

कोल्हापूर : ‘पुढारी’कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना प्रा. डॉ. विजय खरे, खासदार शाहू महाराज, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, खासदार धनंजय महाडिक, शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव.
कोल्हापूर : ‘पुढारी’कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना प्रा. डॉ. विजय खरे, खासदार शाहू महाराज, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, खासदार धनंजय महाडिक, शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत ‘अमेरिका-इराण युद्ध : सद्यस्थिती आणि जागतिक परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. खासदार शाहू महाराज, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, खासदार धनंजय महाडिक यावेळी प्रमुख उपस्थित होते. गर्दीने खचाखच भरलेल्या गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव होत्या.

दि. 28 फेबु्रवारीपासून सुरू असलेले अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्ध केवळ दोन देशांमधील तणाव नसून त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होत आहेत, असे सांगत डॉ. खरे म्हणाले, इराणने सुरक्षेची हमी, घातलेले निर्बंध शिथिल करावे, इराणचे सार्वभौमत्व मान्य करा, युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या, होर्मुझवरील नियंत्रणासाठी मान्यता द्या, अशा अटी ठेवल्या आहेत. तर, अमेरिकेने इराणने आण्विक शस्त्रे विकसित करू नयेत, क्षेपणास्त्र व्याप्ती वाढवू नये, हिजबुल्लाह, हमास आणि हुती यांना मदत करू नये, अशा अटी घातल्या आहेत. यामुळे हे युद्ध आणखी वर्षभर तरी चालेल, अशी शक्यता असून त्यातून तिसर्‍या महायुद्धाची भीतीही आहे. अमेरिका-इराण संघर्ष हा तेल राजकारण, महासत्तांतील स्पर्धा, वाढता राष्ट्रवाद आणि बदलती जागतिक समीकरणे, यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे, असे सांगत डॉ. खरे म्हणाले, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाला दीर्घ ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मध्य पूर्वेतील तेलसंपत्ती, सामरिक वर्चस्व आणि जागतिक व्यापारमार्गावरील नियंत्रणासाठी हा संघर्ष अधिक तीव— झाला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीचे जागतिक व्यापारातील महत्त्व, इस्रायलचा वाढता प्रभाव तसेच चीन, रशिया आणि अमेरिका या महासत्तांतील स्पर्धेमुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे.

प्रा. खरे म्हणाले, इराणवर 1980 पासून निर्बंध आणि दबावाचे राजकारण सुरू असून, प्रतिरोधक आघाडी या संकल्पनेद्वारे इराणने पश्चिम आशियात प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला. 2015 मध्ये अमेरिकेने ‘जेसीपीओए’ करार केला होता. त्यामुळे काही प्रमाणात तणाव कमी झाला होता; मात्र ट्रम्प आल्यानंतर अमेरिकेने 2018 मध्ये करारातून माघार घेतल्यानंतर परिस्थिती पुन्हा चिघळली. यानंतर इस्रायल-हमास युद्धात 60 हजार लोक मारले गेले. त्यातून दाहकता वाढत गेली आणि पश्चिम आशियातील समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली, त्यातून हा संघर्ष नव्या टप्प्यात पोहोचला आहे. या संघर्षाचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असून, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने महागाई, व्यापारातील अडथळे आणि आर्थिक अस्थिरता वाढण्याचे संकट तीव— आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर ताण निर्माण होत असून, सामान्य नागरिकांनाही त्याचे चटके बसत आहेत.

युद्धामुळे भविष्याची चिंता करावी लागणार : प्रभारी कुलगुरू डॉ. जाधव

अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाच्या संभाव्य परिणामांचे डॉ. खरे यांनी केलेले विवेचन ऐकताना भविष्याची चिंता वाटू लागली आहे. आपले कुटुंब, राज्य आणि देश सुरक्षित कसे राहतील, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

प्रारंभी दीपप्रज्वलन झाले. ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्यापीठाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. विश्वराज जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

1 तास 15 मिनिटे श्रोत्यांना खिळवून ठेवले

सायंकाळी पावणेपाच वाजल्यापासूनच श्रोत्यांचा ओघ गोविंदराव टेंबे सभागृहाकडे सुरू झाला होता. साडेपाचपर्यंत सभागृह खचाखच भरले. श्रोते व्याख्यानाची उत्सुकतेने प्रतीक्षा करत होते. सायंकाळी 6.25 वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली, तर 6.33 वाजता प्रा. डॉ. विजय खरे यांच्या व्याख्यानाला प्रारंभ झाला. सुमारे एक तास पंधरा मिनिटे त्यांनी अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाची पार्श्वभूमी, जागतिक परिणाम आणि भविष्यात जगासमोर निर्माण होणारी आव्हाने यांचे सखोल विवेचन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे विशेष योगदान

शिवाजी विद्यापीठात अनेक व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. मात्र, त्या बहुतांश विद्यार्थी आणि प्राध्यापकांपुरत्याच मर्यादित राहतात. ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव व्याख्यानमाला लोकप्रिय होण्यामागे दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे प्रभारी कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ही व्याख्यानमाला सामान्य नागरिकांनीही ऐकावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यामुळेच विद्यापीठ परिसराऐवजी शहरात व्याख्यानमाला आयोजित केली जाते आणि त्यास मोठा प्रतिसाद मिळतो.

आताचे युद्ध तंत्रज्ञानाचे

अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध हे वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. पूर्वी युद्ध जमिनीवर होत असत. नंतर पाण्यावरील युद्ध झाले. आताचे युद्ध हे जमिनीवरील नसून हवाई हल्ले, ड्रोन, मिसाईल, क्षेपणास्त्र, सायबर हल्ले असे तंत्रज्ञानावर हवेतील युद्ध होत असल्याचे प्रा. खरे यांनी सांगितले.

डॉ. ग. गो. जाधव व्याख्यानमाला म्हणजे लोकचळवळ

शिवाजी विद्यापीठाच्या विविध अध्यासने आणि विभागांतर्फे दरवर्षी 40 हून अधिक व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. त्यामध्ये ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव व्याख्यानमाला विशेष लोकप्रिय ठरली असून, ती आता लोकचळवळीचे स्वरूप धारण करत असल्याचे मत डॉ. शिवाजी जाधव यांनी व्यक्त केले.

विचारांचा ठसा महाराष्ट्रभर

डॉ. खरे यांनी ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. डॉ. ग. गो. जाधव यांचा प्रभाव केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्रावर उमटल्याचे त्यांनी सांगितले. सत्यशोधक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी बहुजन समाजाच्या प्रबोधनासाठी मोठे योगदान दिले. महात्मा गांधी यांच्या भेटीनंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत बहुजन समाजाला संघटित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news