

बदलापूर : बदलापूर जवळच्या बेंडशीळ भागात सर्रासपणे डोंगर खोदण्याचं काम सुरू केल आहे. या ठिकाणची जमीन भुईसपाट करण्यात आली असून शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या खोदकामाविरोधात स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि वनशक्ती संस्थेनं आवाज उठवला आहे. या खोदकामामुळे इथं इरसाळवाडी सारखी दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त होती.
बदलापूर पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बेंडशीळ या आदिवासी गावालगत दहा ते पंधरा आदिवासी पाडे आहेत. या ठिकाणी मुंबई-वडोदरा एक्सप्रेस हायवेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र काही दिवसांपासून बेंडशीळ लगतचा डोंगराळ भाग खोदण्याचं काम सुरू असून, यासाठी इथे असलेली शेकडो झाडं तोडण्यात आली आहेत. हे काम नेमकं कुणामार्फत सुरू आहे? हा डोंगर कशासाठी खोदण्यात आला? याची कोणतीही माहिती स्थानिकांना नाही.
संबंधितावर कारवाई करण्याची मागणी
इथले ग्रामपंचायत सदस्य सुकऱ्या हंबीर यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला देखील याबाबतची कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. हा परिसर सह्याद्री डोंगर रांगेतला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अशाप्रकारे अवैध खोदकाम केल्यामुळे इथं इरसाळवाडी सारखी घटना घडू शकते. तसंच पर्यावरणाची मोठी हानी देखील होत आहे. त्यामुळे संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी वनशक्तीचे नंदकुमार पवार यांनी केली आहे.