

ठाणे : शैक्षणिक वर्ष 202627 साठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या नोंदणी व पडताळणीस 27 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ठरलेल्या कालावधीत सर्व शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवार, दिनांक 9 ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत शाळा नोंदणी व शाळा पडताळणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, अनेक शाळांकडून नोंदणी व पडताळणीची प्रक्रिया अपूर्ण राहिल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे यांनी दिनांक 19 जानेवारी 2026 रोजीच्या पत्रान्वये या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले.
यानुसार, दिनांक 20 ते 27 जानेवारी 2026 या कालावधीत संबंधित सर्व विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी आपली ऑनलाईन नोंदणी व शाळा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कालावधीनंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळा पडताळणी करताना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, बंद झालेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत तसेच स्थलांतरित शाळा या आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येणार नाहीत. तसेच, शाळेला ज्या शिक्षण मंडळाची मान्यता आहे, त्याच मंडळाअंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे का, याची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या संदर्भातील सूचना सर्व महापालिकांचे शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी तसेच पंचायत समितींच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, प्रवेश प्रक्रिया पारदर्शक, अचूक व वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या शाळांनी दिलेल्या अंतिम मुदतीत नोंदणी व पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी. चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती नोंदविल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येईल. या कालावधीनंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, ठाणे