

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे असलेल्या योगीधामच्या अजमेरा हाईट्स संकुलातील एका कुटुंबाने धूप-अगरबत्ती लावल्याने त्यातून निघणार्या धुराचा त्रास होत असल्याच्या कारणामुळे शासकीय अधिकारी अखिलेश शुक्ला याने दिलेल्या चिथावणीवरून त्याच्या आठ-दहा हस्तकांनी मिळून मराठी कुटुंबीयांवर बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेचा मराठी एकीकरण समितीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
या प्रकरणी चिथावणीखोर शुक्ला याच्यासह हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीकडे समितीने ठाणे जिल्हा शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे लक्ष वेधले आहे.
मटण-मांस खाणारी मराठी माणसे घाणेरडी असतात. मराठीचे काही सांगू नका. 56 मराठी माणसे माझ्या समोर झाडू मारतात. मी मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन करीन तर तुमचे मराठीपण जाईल. थोडा वेळ थांब तुला बघून घेतो,’ अशा शब्दांत मराठी माणसाची अवहेलना करणार्या शासकीय अधिकारी अखिलेश शुक्ला याने या प्रकरणातील फिर्यादी धीरज देशमुख यांना धमक्या दिल्या होत्या. प्रकरण शांत झाले असे वाटत असतानाच शुक्ला याने त्याच्या आठ ते दहा हस्तकांना त्याच रात्री बोलावून देशमुख कुटुंबीयांसह लता कळवीकट्टे या मराठी कुटुंबीयांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात धीरज देशमुख यांचा भाऊ अभिजीत जबर जखमी झाल्याने त्याला सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करावे लागले. वेळीच उपचार मिळाल्याने अभिजीत याचे प्राण वाचले आहेत.
लोखंडी शस्त्राचा वापर करून हत्येचा प्रयत्न, महिलेचा विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे, जमाव गोळा करणे, मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरून भाषिक व प्रांतिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शुक्ला आणि त्याच्या हस्तकांवर कठोरात्मक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात खडकपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांना निवेदन देण्यात आले आहे.
मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकार्यांंनी अजमेरा संकुलात जाऊन धीरज देशमुख आणि लता कळवीकट्टे कुटुंबीयांची भेट घेतली. शिवाय हल्ल्यातील जखमी अभिजित देशमुख याची रुग्णालयात भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. मराठी एकीकरण समिती आपल्या पाठीशी असल्याचे आश्वासन देशमुख आणि कळवीकट्टे कुटुंबीयांना दिले.
मराठी माणसांवर गंंभीर प्रसंग ओढवला असतानाच मराठी एकीकरण समितीने घेतलेल्या पुढाकारामुळे नागरिकांनी समाज माध्यमांतून समाधान व्यक्त केले आहे. मराठी एकीकरण समिती ही मराठी माणसाचे संरक्षक कवच आहे. मराठीच्या हक्कासाठी वेळ असल्यास तो मराठी एकीकरण समितीला द्या. नि:स्वार्थी भावनेने आणि जाती-पातीचे बंधने तोडून मराठी माणसाच्या हितासाठी लढणार्या मराठी एकीकरण समितीच्या कार्याला मराठी नागरिकांनी एकजुटीने पाठिंबा दिला पाहिजे, अशी अनेक प्रकारची मते मराठी भाषक नागरिकांनी समाज माध्यमांवर व्यक्त करण्यात येत आहेत.