

डोंबिवली : कल्याणच्या योगीधाम भागातील आजमेरा हाईट्स संकुलातील मराठी कुटुंबियांना दहा जणांच्या टोळक्याच्या साह्याने हल्ला करणारा शासनाच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातील अधिकारी अखिलेश शुक्ला याला आरटीओचा चांगलाच दणका दिला आहे. अधिकार नसतानाही महाराष्ट्र शासनच्या स्टिकरसह अंबर दिव्याचा कारवर नियमबाह्य वापर करून जनमानसांत रूबाब मारणारा अखिलेश शुक्ला याच्या भोवती कारवाईचा फास आवळत चालला आहे.
आरटीओच्या नियमांची पायमल्ली केल्याच्या आरोपाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या पथकाने या कारसह अंबर दिवाही जप्त केला. शुक्रवारी केलेल्या या कारवाईत शुक्ला याला 9 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांनी दिली.
कल्याणातील मराठी कुटुंबीय मारहाण प्रकरण
अखिलेश शुक्लाभोवती आवळला आरटीओने फास
महाराष्ट्र शासनाच्या स्टिकरचा नियमबाह्य वापर
खासगी कारवर जप्तीची कारवाई
अंबर दिव्याचा अवैध वापरल्याने ठोठावला 9 हजार 500 रुपयांचा दंड
एम एच 05 /बी एस/5994 क्रमांकाची अखिलेश शुक्ला याच्या मालकीची कार असून या कारचा विमा संपला आहे. शिवाय पीयुसी देखिल संपले असताना गेल्या चार वर्षांपासून तो स्वत:च्या खासगी वाहनावर महाराष्ट्र शासनाचे स्टीकर लावून फिरत होता. कारच्या आतल्या बाजूस अंबर दिवा ठेवण्यात येत होता. अंबर दिव्याचा वापर कुणी करावा आणि करू नये याचे केंद्रीय परिवहन विभागाचे नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन पर्यटन विकास महामंडळातील शासकीय अधिकारी शुक्ला याने केले आहे.
मराठी विरुद्ध उत्तरभारतीय वादाचा मुद्दा उफाळून आल्यानंतर या घटनेची शासनाने गंभीर नोंद घेतली आहे. कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक रोहित पवार आणि प्रियंका टपले यांच्या पथकाने आरोपी अखिलेश शुक्लाच्या खासगी वाहनासह त्या वाहनातील अंबर दिव्यावर जप्तीची कारवाई केली.
केंद्रीय मोटार वाहन कायद्याप्रमाणे अंबर दिवा कुणी लावावा आणि कोणी लावू याचे निर्देश आहेत. या निर्देशांचे उल्लंघन शासकीय अधिकारी अखिलेश शुक्ला याने केले आहे. त्याच्या वाहनाचा विमा आणि पीयुसी चार वर्षांपूर्वीच संपले आहे. हे वाहन नियमाबाह्य पध्दतीने रस्त्यावर वापरले जात होते. याबद्दल अखिलेश शुक्ला याला 9 हजार 500 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचे खासगी वाहन अंबर दिव्यासह जप्त करण्यात असून खडकपाडा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी सांगितले.