

डोंबिवली : मराठी भाषिकांच्या मुंबईत मराठीचा घोर अपमान झाल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेवरुन समोर आले आहे. केवळ मराठीत संभाषण केल्यामुळे डोंबिवलीकर ज्येष्ठ नागरिकाला हिंदी भाषिकाकडून अपमानस्पद वागणूक मिळाली आहे.
इतकेच नाही तर कुठेही तक्रार करा, आमचे कुणीही वाकडे करू शकणार नाही, अशीही दमदाटी हिंदी भाषिक व्यक्तीने मराठी भाषिकाला दटावले आहे. मुंबईत पार पडलेल्या एका प्रदर्शन कार्यक्रमात 82 वर्षीय डोंबिवलीकर रमेश विठ्ठल पारखे यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. स्वतःलाच नव्हे तर मराठी भाषेला अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांच्या विरोधात या ज्येष्ठ नागरीकाने जीपीओ पोस्ट खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे. आता या संदर्भात पोस्ट खाते आणि राज्य सरकार काय भूमिका घेते ? याची प्रतिक्षा तक्रारदार करत आहेत.
या संदर्भात ज्येष्ठ नागरिक रमेश पारखे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्ट खात्यातर्फे महापेक्स - 2025 प्रदर्शन 22 ते 25 जानेवारी दरम्यान चार दिवस मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात डोंबिवलीकर रमेश पारखे यांना काही साहित्य खरेदी करायचे होते. खिडकी नंबर 32 वर असलेल्या व्यक्तीशी पारखे यांनी मराठी भाषेत संभाषण केले. मात्र खिडकीवरील व्यक्तीकडून त्यांना हिंदीत बोला असे सांगण्यात आले.
परंतु पारखे यांनी हिंदीत का बोलू ? आपणास मराठी भाषेत बोलता येत नाही की मी काही बोललेलो तुम्हाला समजत नाही का ? असा प्रतिप्रश्न केला. मात्र त्या व्यक्तीने आपल्याशी हिंदीत बोलण्याची रट लावली.
इतकेच नाही तर माझ्याबद्दल कुठेही तक्रार करा, माझे काहीही बिघडणार नाही, मी मराठी बोलणार नाही, असा तोरा केला. सदर व्यक्तीच्या ताठर भूमिकेमुळे व्यथित झालेल्या रमेश पारखे यांनी तक्रार केली.
महाराष्ट्रात राहून मराठीशी द्वेषभावना व्यक्त करणाऱ्या संबंधित व्यक्तीला धडा कोण शिकवणार? माझ्यासारख्या वयस्कर व्यक्तीला जर अशी वागणूक मिळत असेल तर न्याय कुणाकडे मागायचा ? असा सवाल रमेश पारखे यांनी उपस्थित केला आहे. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देणारे राज्य सरकार या तक्रारीची कशी दखल घेणार, संबंधित व्यक्तीवर काय कारवाई करणार ? याकडे रमेश पारखे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.