

मिरा रोड : कांदिवली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडून एका 44 वर्षीय प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुड्डू शिवराम उपाध्याय असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुड्डू उपाध्याय हे रेल्वेने प्रवास करत असताना कांदिवली स्थानकाजवळ अचानक लोकलमधून खाली पडले. या भीषण अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती.
घटनेनंतर त्यांना तातडीने मीरा रोड येथील गुरुकृपा या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या जखमा गंभीर असल्याने उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान 3 फेब्रुवारी रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या अपघाती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक गजानन जिंकलवाड यांनी मृताचा पंचनामा केला. त्यानंतर, भाईंदर पश्चिमेकडील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार धनू राठोड हे करत आहेत.