

मुरबाड (ठाणे) : श्याम राऊत
कल्याण माळशेजघाट राष्ट्रीय महामार्ग क्र. 61 रस्त्यावरील सावर्णेपासून ते एमटीडीसी जुन्नर हद्दीपर्यंतचा 12-14. किमी चा रस्ता हा या घाटातून जातो, या रस्त्यावर वाहन चालकांना पावसाळ्यात खड्डयातून वाट चुकवित कसरत करावी लागते आहे. येथील खड्डयांमुळे माळशेज घाट मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. त्यामुळे वाहन चालकांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
जागोजागी संरक्षण भिंती जिर्ण झाल्या आहेत, काही भिंती कोसळल्या आहेत, पावसाळ्यात रात्री दाट धुक्यात रस्ता समजावा म्हणून पांढरे पट्टे देखील मारले गेले नसल्यामुळे अपघातास कारण ठरतात. रस्त्याच्या कडेला झाडेझुडपे वाढल्याने वाटही दिसत नाही, त्यातच दिशादर्शक फलक गायब असल्याने धोक्याची वळणे समजत नाहीत, त्यामुळे वाहन चालकांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून घाटात दरड कोसळू नयेत म्हणून कोट्यवधीची उधळपट्टी करूनही 15 तारखेला घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. मग खर्च कोणाच्या फायद्यासाठी केला होता असा सवाल वाहन चालक करीत आहेत. पावसाळ्यात अनेकदा घाटातील कडे कोसळून अपघात होत असल्याने कोट्यवधींची उधळपट्टी करून जागोजागी जाळ्या बसविण्यात आल्या. परंतु घाटात दरड कोसळण्याचे सत्र कायम आहे.
दरम्यान 15 तारखेला वाहनांची वर्दळ सुरू असतानाच दरड कोसळून वाहतूक काही काळ बंद पडल्यावर वाहतूक कोंडी झाली. ज्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे या घाट रस्त्याची जबाबदारी आहे ते अधिकारी तालुक्यात न राहता ठाणे नाशिक टिटवाळा शहरी भागात राहतात, एखाद्या वेळेला दरड कोसळणे, मलबा पडल्यास स्थानिक महामार्ग पोलीस किंवा टोकावडे पोलीस तो मलबा हटवितात किंवा हा विभाग त्यांच्याकडून माहिती घेऊन नेमलेल्या ठेकेदारांच्या यांत्रिक साधनाने मलमा उपसण्याचे काम करतात. एकंदरीत राष्ट्रीय महामार्ग विभागाला या घाटाच्या सुरक्षिततेबाबत कसलेच सोयर सुतक नसते, दोन दिवसांपासून हा धोकादायक घाट कोसळण्यास सुरुवात झाली आहे. या घाटात दरड कोसळल्याचे प्रकार वारंवार घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याने प्रवाशांनी व वाहन चालकांना खबरदारी घेणे गरजेचे आहे.