

नेवाळी : ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगड यात्रेला जया एकादशीपासून सुरुवात झाली असून माघ पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन पूर्णतः सतर्क झाले आहेत. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हिललाईन पोलीस ठाण्याच्या वतीने श्री मलंगगडावर अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले आहे. मोठ्या फौज फाट्यासह केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांच्या हाती मात्र काहीच लागलं नाही.
हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 100 पोलिसांच्या फौजफाट्याने हे मंगळवारी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले आहे. या कारवाईत गडावरील परिसर, दुकाने, घरे तसेच संशयित ठिकाणी झडती घेण्यात आली आहे. कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान 6 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, महिला पोलीस अंमलदार, होमगार्ड, एस.आर.पी.एफ.चे दोन प्लाटून आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या गुप्तचर विभागाचे कर्मचारी सहभागी होते. माघ पौर्णिमेला होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने मलंगगडावर दाखल होत असतात. या यात्रेला पूर्वी हिंदूमुस्लीम संवेदनशीलतेची किनार लाभलेली असल्याने यंदा पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. कोणतीही अफवा, दंगलसदृश परिस्थिती किंवा कायदा-सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये काहीही संशयास्पद आढळून आले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या फ्युनिक्युलर सेवा सुरू असल्याने गडावर पोलिसांची सतत वर्दळ असून संपूर्ण परिसर पोलिसांच्या नियंत्रणाखाली आहे. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे समाजकंटक, दंगलखोर घटक मलंगगड यात्रेपासून दूर राहिल्याचे चित्र असून भाविक सुरक्षित वातावरणात दर्शन व पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. यात्रेदरम्यान कोणत्याही अनुचित प्रकारास अजिबात थारा दिला जाणार नाही, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.