Malanggad dispute Maharashtra: मलंगगडाचा लढा थांबणार नाही; माघ पौर्णिमेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाम भूमिका
नेवाळी : माघ पौर्णिमेनिमित्त कल्याणच्या श्री मलंगगडावर उपस्थित राहून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडाशी संबंधित संघर्षावर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. ‘धर्मविर आनंद दिघे यांनी जो लढा उभा केला, त्याचा पाठपुरावा आजही सुरू आहे आणि या लढ्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल,’ असा ठाम विश्वास त्यांनी शिवसैनिकांसमोर व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानामुळे उपस्थित शिवसैनिक आणि हिंदू भाविकांमध्ये उत्साह संचारला होता.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी श्री मलंग मच्छिंद्रनाथांच्या मंदिरात विधिवत महाआरती केली. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात पार पडलेल्या या महाआरतीदरम्यान संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हालेला होता. या वेळी हिंदू मंचचे अध्यक्ष दिनेश देशमुख, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, कल्याण पूर्व विधानसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
महाआरतीनंतर उपस्थितांशी संवाद साधताना शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या कार्याचा उल्लेख केला आहे. दिघेंनी हिंदुत्व, श्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध जो संघर्ष उभा केला, तो आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मलंगगडाशी संबंधित प्रश्नांमध्ये सरकार ठाम असून कायदेशीर मार्गाने आणि ठोस भूमिकेतून हा लढा पुढे नेला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.\
मलंगगड ही केवळ एक यात्रा नसून हिंदू समाजाच्या श्रद्धेचे आणि अस्मितेचे केंद्र आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे या परंपरेला धक्का लागू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा शिंदे यांनी दिला आहे. यात्रेदरम्यान शांतता, शिस्त आणि संयम राखण्याचे आवाहन करत त्यांनी पोलिस व प्रशासनाच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या या ठाम विधानामुळे मलंगगडाचा संघर्ष हा केवळ धार्मिक नव्हे तर ऐतिहासिक आणि वैचारिक लढा असल्याचे अधोरेखित झाले असून, धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मलंगगडावर मच्छिंद्रनाथांच्या मंदिरात आरतीसाठी जात असताना पोलिसांच्या नियोजनात मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आलं आहे. हिंदू माणसाच्या महाआरतीसाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटकाव केला होता. भाजपाच्या पहिल्या झालेल्या आरती नंतर पोलिसांची तारांबळ उडाल्याचे चित्र मलंगगडावर दिसून आला आहे.
श्री मलंगगड मुक्तीच्या मुद्द्यावर भाजपही मैदानात
श्री मलंगगडावर शिवसेना, हिंदू मंचाकडून दरवर्षी होणाऱ्या महाआरती सोहळ्याआधीच यंदा भाजपाने प्रथमच माघ पौर्णिमेनिमित्त मलंगगडावर हजेरी लावली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब आणि आमदार सुलभा गायकवाड यांनी श्री मलंगगडावर जाऊन माघ पौर्णिमेला पहिल्यांदाच महाआरती केली आहे. भाजपाच्या या अचानक झालेल्या सहभागामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून श्री मलंगगडाचा प्रश्न शिवसेना, हिंदू मंच आणि शिवसैनिकांच्या ठाम भूमिकेमुळे राज्यभर गाजत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी उभा केलेला लढा आणि त्यानंतर शिवसेनेने घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे मलंगगड हा हिंदू अस्मितेचा विषय ठरला आहे. अशा पार्श्वभूमीवर भाजपाने यंदा प्रथमच माघ पौर्णिमेच्या यात्रेत सहभाग घेणे, हे शिवसेनेच्या भूमिकेचे अप्रत्यक्ष समर्थन असल्याचे बोलले जात आहे. या महाआरती सोहळ्याला भाजपाच्या आमदारांसह कल्याण-डोंबिवली परिसरातील सुमारे 20 नगरसेवक उपस्थित होते. तसेच भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र वारे आणि श्री मलंगगड मंडळाचे अध्यक्ष समीर भंडारी यांनीही उपस्थित होते. श्री मलंग मच्छिंद्रनाथांच्या मंदिरात भाजपाच्या नगरसेवकांसह महाआरती करण्यात आली आणि ‘श्री मलंग मुक्ती’चा नारा देण्यात आला आहे. मात्र, वर्षानुवर्षे शिवसेनेने रस्त्यावर उतरून, न्यायालयीन लढा देत आणि श्रद्धेच्या रक्षणासाठी उभे राहून जो संघर्ष केला, त्यानंतर आता भाजपाने केलेली ही हजेरी म्हणजे उशिरा आलेली जाणीव असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे. श्री मलंगगडाचा विषय केवळ धार्मिक नसून हिंदू समाजाच्या अस्मितेचा आहे, हे शिवसेनेने आधीच सिद्ध केले असून आता इतर पक्षही त्याच मार्गावर येताना दिसत आहेत, अशी चर्चा सुरू आहे.
श्री मलंगगडावर ठाकरेंच्या शिवसेनेची महाआरती
माघ पौर्णिमेनिमित्त श्री मलंगगडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य महाआरती सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यास शिवसेनेचे नेते व माजी खासदार राजन विचारे, शिवसेना नेते केदार दिघे यांच्यासह पक्षातील दिग्गज नेते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. टाळमृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात पार पडलेल्या या महाआरतीत संपूर्ण मलंगगड परिसर शिवमय वातावरणात न्हालेला दिसून आला आहे. महाआरतीदरम्यान शिवसैनिकांनी एकत्र येत ‘मलंग मुक्ती’चा बुलंद नारा दिला आहे. वर्षानुवर्षे शिवसेनेने उचलून धरलेल्या मलंगगडाच्या प्रश्नावर आपली भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडत, श्रद्धा, परंपरा आणि हिंदू अस्मितेच्या रक्षणासाठी शिवसेना सदैव अग्रभागी असल्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला आहे. यावेळी उपस्थित नेत्यांनी मलंगगडाशी संबंधित संघर्षाचा आढावा घेतला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी उभा केलेला लढा हा केवळ राजकीय नव्हे तर श्रद्धेचा आणि अस्मितेचा असल्याचे नमूद करत, त्या लढ्याची मशाल शिवसेना अखंडपणे पुढे नेत असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मलंगगड हा हिंदू समाजाच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असून, त्याचे पावित्र्य आणि परंपरा अबाधित ठेवणे हेच शिवसेनेचे ध्येय असल्याचे उपस्थित नेत्यांनी स्पष्ट केले. दरम्यान शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे हे श्री मलंगगडावर दाखल होताच त्यांनी गडावरील असलेल्या प्राचीन दुर्गा माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर गणपती मंदिरात दर्शन घेतल्यानंतर श्रीमलंग मच्छिंद्रनाथांच्या मंदिरात महाआरती केली आहे.

