

नेवाळी : मलंगगडावरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गडावरील फ्युनिक्युलर स्टेशनच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असल्याचे दिसून येत असून, भल्या मोठ्या हॉटेलची उभारणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे बांधकाम वनविभागाच्या जागेत होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात असून, याकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्याची चर्चा रंगू लागली आहे.
यापूर्वीही गडावर वाढत्या अतिक्रमणांच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वनविभागाने तातडीने कारवाई करत अनधिकृत बांधकामांवर बडगा उगारला होता. मात्र, काही काळ शांतता राहिल्यानंतर आता पुन्हा एकदा अतिक्रमण सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, यावेळी सुरू असलेले बांधकाम मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वनजमिनीवर हॉटेल उभारणीसारखा गंभीर प्रकार सुरू असताना संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अतिक्रमणाच्या या नव्या प्रकारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून होत आहे. श्रीमलंगगडाचे धार्मिक व पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता, अशा प्रकारांना वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे आता वनविभाग पुढील काळात कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.