

मुंबई ः धार्मिक विधींमुळे वाळकेश्वर परिसरातील ऐतिहासिक बाणगंगा तलावात साचलेले निर्माल्य आणि मृत पावलेल्या माशांमुळे मुंबई महानगरपालिकेने सलग तीन दिवस स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत तब्बल 10 मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले. तसेच तलावातील माशांना पुरेसा प्राणवायू मिळावा यासाठी वायूविजन व्यवस्थेद्वारे सहा पंप लावून तलावातील पाणीही स्वच्छ करण्यात आले.
बाणगंगा तलावाचे व्यवस्थापन एका खासगी संस्थेकडे आहे. 21 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्येला नागरिकांनी पिंडदानासाठी बाणगंगा तलावात प्रचंड गर्दी केली होती. निर्माल्य, पिंडदानासाठी तलावाजवळच कृत्रिम तलाव उभारला होता.
रविवार, 21 सप्टेंबर 2025 रोजी 6 मेट्रिक टन, सोमवार, 22 सप्टेंबर 2025 रोजी 2 मेट्रिक टन आणि मंगळवार, 23 सप्टेंबर 2025 रोजी 2 मेट्रिक टन असे दहा मेट्रिक टन कचर्याचे संकलन करण्यात आले. तसेच, संपूर्ण पितृपक्षात तलाव परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी फिरत्या प्रसाधनगृहांची (मोबाईल टॉयलेट) व्यवस्था करण्यात आली होती.
नागरिकांचे पालिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष
तलाव परिसरात कर्तव्यावर हजर असलेल्या महापालिकेच्या कर्मचार्यांनी तलावात निर्माल्य आणि पाने-फुले टाकू नका, असे आवाहनही केले होते. तरीही काही नागरिकांनी पिंडदान करून साहित्य तलावात सोडले. यामुळे तलावातील पाणी दुषित झाले होते. परिणामी, शेकडो मासे मृत पावले होते. त्यामुळे महापालिकेचा डी विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभागाने तलावाची स्वच्छता मोहीम हाती घेतली.