

ठाणे : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा बदल करत शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक पात्रतेला अधिक महत्त्व देणारी सुधारित गुणांकन पद्धत लागू केली आहे. नव्या प्रणालीमुळे अधिक शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना शिक्षक पदासाठी निवडीत स्पष्टपणे अधिक संधी मिळणार आहेत.
‘मुलाखतीसह निवड’ या पर्यायात पूर्वी होत असलेल्या व्यक्तिनिष्ठ निवडींवर नियंत्रण आणत गुणाधिष्ठित पारदर्शक पद्धतीवर भर देण्यात आला आहे.
‘पवित्र’ पोर्टलमार्फत सन 2017 पासून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात असून ती उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सुरू करण्यात आली होती. मात्र, खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘मुलाखतीसह’ निवड करताना उमेदवारांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होत नसल्याचे आढळले. त्यामुळे 6 ऑगस्ट 2024 च्या कार्यपद्धतीत बदल करून नव्या गुणांकन प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बदलामागे शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि पात्र उमेदवारांना न्याय देणे हा मुख्य उद्देश आहे.
सुधारित गुणांकन पद्धतीनुसार एकूण 100 गुणांपैकी 75 गुण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी, 8 गुण व्यावसायिक अर्हतेसाठी, तर 7 गुण शैक्षणिक अर्हतेसाठी देण्यात येणार आहेत. याशिवाय मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी 10 गुण राखीव आहेत.
या पद्धतीत शैक्षणिक पात्रतेला स्वतंत्र वजन दिल्यामुळे अधिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना स्पर्धेत आघाडी मिळणार आहे. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराची निवड बंधनकारक राहणार असल्याने निवड प्रक्रिया अधिक निष्पक्ष होणार आहे.
यासोबतच उमेदवारांच्या प्राधान्यक्रम नोंदविण्याच्या प्रक्रियेतही बदल करण्यात आले आहेत. ‘मुलाखतीशिवाय’ प्रकारासाठी कमाल 100 आणि ‘मुलाखतीसह’ प्रकारासाठी 50 प्राधान्यक्रम नोंदवण्याची मुभा देण्यात आली आहे. शिक्षण अधिकाऱ्यांकडून गुणांकनाची पडताळणी अनिवार्य करण्यात आल्याने प्रक्रियेत अधिक काटेकोरपणा येणार आहे. एकूणच, या बदलांमुळे शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना शिक्षक पदावर अधिक प्रमाणात संधी मिळून शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता उंचावण्याची अपेक्षा आहे.
नव्या गुणांकन पद्धतीमुळे शिक्षक भरतीत ‘जास्त शिक्षण जास्त संधी’ हे समीकरण अधिक स्पष्ट झाले आहे. यामुळे उमेदवारांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळणार असून दीर्घकालीन दृष्टीने शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षकांची संख्या वाढण्यास मदत होईल.
नव्या पद्धतीचे फायदे
गुणवत्ताधारक आणि पात्र उमेदवारांना अधिक संधी
निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढ
श्मुलाखतीतील व्यक्तिनिष्ठता कमी होऊन वस्तुनिष्ठ मूल्यांकन
शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेला योग्य महत्त्व
श्समान गुणांमध्ये स्पष्ट निवड निकष (वय, बारावीचे गुण)
श्शिक्षणाधिकाऱ्यांच्या पडताळणी मुळे प्रक्रिया अधिक काटेकोर
उमेदवारांना अधिक प्राधान्यक्रम निवडण्याची लवचिकता