

दिलीप शिंदे
ठाणे: एसआयआर प्रक्रियेमुळे महाराष्ट्रातील सुमारे २ कोटी ७ लाखांपेक्षा अधिक मतदार वगळले जाणार असताना निवडणूक आयोगाच्या धोरणामुळे २ ऑक्टोबर २००६ पासून पुढे जमलेल्या कुठल्याही जेन- झीला मतदार नोंदणी करता येत नाही.
लोकसभा, विधानसभा निडणुकांपूर्वी महाविद्यालयीन मतदार नोंदणीसाठी मोहिम राबवून अर्ज भरून घेऊन सुद्धा १८ वर्ष पूर्ण झालेल्या नव मतदारांची गेल्या दोन वर्षांपासून नोंदणी प्रक्रियाच ब्लॉक करून विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये लाखो तरुणांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने विशेष मोहिमा राबवून १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुण तरुणींची मतदार नोंदणी प्रक्रिया राबविली. महाविद्यालयांमध्ये जाऊन १८ वर्ष पूर्ण होण्यास ६ महिने शिल्लक असणाऱ्या तरुणांकडूनही अर्ज भरून घेत १८ वर्ष पूर्ण होताच ते मतदार होणार अशी आश्वासने, वचने देऊन निवडणूक आयोगाने शाबासकी मिळविली होती.
मात्र निवडणूक आयोगांच्या ह्या मोहिमा फसव्या निघाल्या. एकाही जेन- झीला मतदार बनवून घेण्यात आलेले नाही. त्यांचे अर्ज धूळ खात पडले असून ऑनलाईन प्रक्रियाही ब्लॉक करण्यात आलेली आहे.
२ ऑक्टोबर २००६ पासून पुढे जन्मलेल्या एकाही तरुण- तरुणींची मतदार नोंदणी होऊच शकलेली नाही. ते होऊ घातलेले नव मतदार आता २० वर्षाचे झाले आहेत. तरी देखील ते मतदार होऊ शकत नाही कारण निवडणूक आयोगाने ब्लॉक केलेली तारीख अजूनही खुली करण्यात आलेली नाही.
मतदार नोंदणी करण्यासाठी अर्ज भरल्यानंतर जन्म दिनांक रकाना आला कि ऑनलाईन अर्ज पुढेच जात नाही. फक्त १ ऑक्टोबर २००६ पर्यंत जन्मलेल्यांची मतदार नोंदणी होत आहे. आता एसआयआर मोहिम राबवून मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे.
त्यासंबंधीची पुढील प्रक्रिया सुरु असून अंतिम यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. एकंदरीत जेन- झीना मतदार बनवून घेण्याची प्रक्रिया कधी सुरु होणार आणि तरुणांना मतदार होण्यापासून दोन वर्षे का रोखण्यात आले याचे उत्तर निवडणूक आयोगाकडून देणे टाळले जात आहे. याबाबत ठाणे जिल्हा उपनिवडणूक अधिकारी वैशाली माने यांना विचारणा केली असता नवीन मतदार नोंदणी ३१ ऑगस्टनंतर सुरु होईल असे त्यांच्यकडून सांगण्यात आले.