ठाणे : पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांची आज (दि.१०) ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये जाहीर सभा होणार असून ठाकरेंच्या सभेपूर्वीच उबाठा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत बॅनर वॉर सुरु झाले आहे. दोन दिवसांपूर्वी उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी दुसऱ्याचा पक्ष चोरणे हे हिंदुत्व आहे का ? या आशयाचे बॅनर लावून शिंदेच्या शिवसेनेला डिवचले होते. मात्र आज शिंदेच्या शिवसेनेकडूनही बॅनरच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात आले असून यामध्ये बॅनरवरतील व्यंगचित्राच्या माध्यमातून सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्या समोर उद्धव ठाकरे गुडघे टेकलेले दाखवण्यात आले.
या बॅनरबाजीमुळे उबाठा पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झालेले असून उबठाकडून हे बॅनर हटवण्यात येत आहेत. मात्र यामुळे ठाण्याचे राजकारण मात्र चांगलेच तापले आहे.
दिल्लीचा दौरा केल्यानंतर उद्धव ठाकरे हे ठाण्यात आज (दि.१०) संध्याकाळी जाहीर सभा घेत आहेत. ठाकरे यांच्या सभेसाठी माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र ही सभा होण्यापूर्वीच दोन्ही पक्षात बॅनरबाजीमुळे कमालीचा संघर्ष उफाळून आला आहे. ठाण्यातील तीन पेट्रोल पंप, हरिनिवास सर्कल आणि ठीक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे बॅनर्स शिंदेच्या शिवसेनेकडून लावण्यात आल्यानंतर या विरोधात ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे.
ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना डीचवनारे बॅनर्स लावण्यात आले आहेत त्या ठिकाणाहून ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून बॅनर्स काढण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठत असताना ठाण्यात बॅनर्सवर व्यंगचित्राच्या माध्यमातून सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्या समोर उद्धव ठाकरे गुडघे टेकलेले दाखवण्यात आले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या मागे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे देखील उभे असलेले दाखवण्यात आले आहे. या बॅनर्स विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. ठाण्यात एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले असताना उद्धव ठाकरे यांना अशाप्रकारे डिचवण्याचे बॅनर देखील लावण्यात आले असल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आम्हाला जे म्हणत होते दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालतात, मग हे काय आहे, हे लोटांगण आहे की आणखी काय आहे? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. बाळासाहेब होते तेव्हा एक दबदबा होता, अख्खी दिल्ली बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर यायची, आता उलट झालेल आहे. दिल्लीच्या चकरा माराव्या लागत असून हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याची टीका यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. तर ठाणे हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. आणि लोकसभेत आम्ही तो राखला, ठाण्यामध्ये आता काय आहे? उबाठाचा ठाण्यात खालसा झालेला आहे, खालसा झालेल्यांमध्ये काय जीव भरणार, त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवला तर चांगल होईल असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.