

ठाणे : जागतिक तापमान वाढ आणि वातावरणामध्ये झालेले बदल याचा संपूर्ण भारतातमध्येच प्रभाव दिसून येत असला तरी, या सर्व बाबींचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला असल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. जागतिक तापमानामुळे राज्यातील जवळपास 85 टक्के नागरिक प्रभावीत झाले असल्याचे या अहवालात म्हंटले आहे. यामध्ये काही नागरिकांना आरोग्याचे प्रश्न देखील निर्माण झाले असून असेच तापमान वाढत राहिले तर भविष्यात याचे गंभीर परिणाम नागरिकांना सोसावे लागण्याची शक्यता आहे.
हिवाळा,उन्हाळा आणि पावसाळा असे साधारणतः तीन प्रमुख ऋतू हे भारतामध्ये समजले जातात. मात्र गेल्या काही वर्षात हे ऋतू चक्र देखील बदलेले असून यामुळे नेमका कोणता ऋतू सुरु आहे याचा विचार नागरिकांना करावा लागतो. गेल्या काही वर्षात पाऊस देखील अनियमित स्वरूपाचा पडत आहे. तर तापमान देखील वाढले असल्याचे समोर आले आहे.
तापमान वाढीमुळे देशातील अनेक शहरांमध्ये विशेष करून दुष्काळी ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या देखील तीव्र स्वरूपाची जाणवू लागली आहे. येल प्रोग्रॅम ऑन क्लायमेट चेंज कम्युनिकेशनच्या क्लायमेट ओपिनियन मॅप्स फॉर इंडियाच्या अहवालामध्ये जागतिक तापमान वाढीविषयी अनेक बाबी समोर आल्या आहेत.
यामध्ये जागतिक वाढीचा परिणाम आणि विशेष करून या जागतिक तापमान वाढीचा महाराष्ट्रातील किती टक्के नागरिकांना याचा फटका बसला आहे याची टक्केवारी देखील या अहवालामधु समोर आली आहे.
राज्यात गेल्या काही वर्षात मुसळधार पासून आणि त्यामुळे निर्माण झालेला ओला दुष्काळ देखील नागरिकांनी अनुभवला आहे. या अहवालानुसार 77 टक्के नागरिकांना जागतिक तापमान वाढीचा फटका बसला असून 85 टक्के नागरिकांना दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.
राज्यातील प्रमुख शहरे असलेल्या मुंबई, नाशिक,ठाणे यासारख्या शहरांवर अनियमित पाऊस आणि तापमान वाढ अशा दोन्ही गोष्टींचा संमिश्र परिणाम राज्यातील नागरिकांवर होत आहे. भारतामधील शहरांचा विकास हा झपाट्याने होत आहे. त्यामुळे या शहरांमधील वातावरण देखील झपाट्याने बदलत आहे.