

Mira Bhayander Vasai Virar Drug Cases
मीरा-भाईंदर, वसई-विरार या आयुक्तालय क्षेत्रात ड्रग्ज तस्करीचे सर्वाधिक गुन्हे
आरोपींचे कनेक्शन बांगलादेशी टोळ्यांशी असल्याचे तपासात उघड
कारवाईत ४७.५० कोटींचे अंमली पदार्थ जप्त
सुरेश साळवे
ठाणे : महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर, वसई-विरार या आयुक्तालय क्षेत्रात ड्रग्ज तस्करीचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले जात असून, या गुन्ह्यांमध्ये परदेशी टोळ्यांचा सहभाग वाढत चालला आहे. ठाणे गुन्हे शाखेने नुकत्याच केलेल्या कारवाईत ४ कोटींच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक केली असून, या आरोपींचे कनेक्शन बांगलादेशी टोळ्यांशी असल्याचे तपासात उघड झाले आहे. पनवेलमधील कारवायांमध्येही अशीच स्थिती दिसून आली आहे.
मिरा भाईंदर, वसई, विरार पोलीस आयुक्तालय हद्दीत नायजेरियन व बांगलादेशी नागरिक हे मोठया प्रमाणात वास्तव करत असल्याचे दिसून येत आहे. नायजेरियन नागरिक हे अंमली पदार्थांची तस्करी, विक्री करत आहेत. यामध्ये कोकेन व मेफोड्रोन, गांजा, चरस हे अंमली पदार्थ विक्री करताना आढळतात. पोलीस आयुक्तालय हद्दीत गेल्या सात महिन्यांत अमली पदार्थ विक्री करणाऱ्या २२ नायजेरियन नागरिकांविरूध्द कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ४७.५० कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक व पोलीस हे नायजेरियन नागरिकांवर सातत्याने कारवाई करूनही त्यावर अंकुश घालण्यात अपयशी ठरत आहेत.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून नायजेरियन नागरिकांवर कारवाईचे प्रमाण वाढले आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्ष व पोलीस हे नायजेरियन नागरिकांना अंमली पदार्थांची तस्करी करताना कारवाई करत आहेत. १ जानेवारी २०२५ ते ३१ जुलै २०२५ या सात महिन्यांत अमली पदार्थ विक्री करणाऱ्या नायजेरिन नागरिकावर विविध पोलीस ठाण्यात २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात २१ नायजेरियन व १ नेपाळी असे २२ पुरूष तर ६ नायजेरिन महिलांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून २१ किलो २८६ ग्रॅम मेफोड्रोन , कोकेन १५ किलो , इफीद्रिंन १ किलो ४९ ग्रॅम, गांजा साडे चौतीस किलो असा जवळपास साडे सत्तेचाळीस कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहे. मिरा भाईंदर मधील मिरा रोड व वसई विरार मधील नायगाव, प्रगतीनगर, नालासोपारा पूर्व या परिसरात नायजेरियन नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव करत आहेत.
पोलिसांनी परदेशी नागरिकांना घर भाडयाने दिल्यानंतर लगेच पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे बंधनकारक केले आहे. पोलिसांना माहिती दिली नाही, तर घर मालकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे बेकायदेशीर वास्तव करणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. नायजेरियन नागरिक राहत असलेल्या परिसरात पोलिसांकडून शोध मोहीम राबवली जात आहे. यामध्ये त्यांची कागदपत्रे तपासून चौकशी केली जात आहे. त्यामुळे त्यांची माहिती उपलब्ध होत आहे.
नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर येथे नायजेरियन नागरिकांची वसाहत आहे. अमली पदार्थांच्या विक्रीमध्ये जास्त पैसे मिळत असल्यामुळे नायजेरियन पुरुष व महिला या अमली पदार्थांची तस्करी करतांना आढळून येत आहेत. नायजेरियन नागरिकांच्या व्हिजाची मुदत संपल्यानंतर देखील ते भारतामध्ये बेकायदेशीररित्या वास्तव करत असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाते.
नायजेरियन आणि बांगलादेशी टोळ्यांची प्रमुख केंद्रे नालासोपारा, पनवेल, भिवंडी, मिरा-भाईंदर या भागात आढळून येतात. तपास अहवालानुसार, २० ते ३० टोळ्या आणि ५०० ते ६०० लोकांचा या तस्करीत सहभाग आहे. मात्र, तपास यंत्रणा आणि प्रशासनाची ठोस भूमिका नसल्याने हे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे. हजारो कोटींचे ड्रग्ज जप्त झाले असले तरी टोळ्यांचे समूळ उच्चाटन झालेले नाही.
३५-४० वर्षांपूर्वी मुंबईत दाऊद, गवळी यांसारख्या गँगवॉर टोळ्यांचा धुमाकूळ होता. पोलिसांच्या कडक कारवाईमुळे या टोळ्या संपल्या, मात्र आता नायजेरियन आणि बांगलादेशी टोळ्यांनी ड्रग्ज तस्करीचे जाळे पसरवले आहे. अनेक टोळ्यांचे कारनामे उघडकीस आले असले तरी कठोर उपाययोजना न झाल्याने हे प्रकार खुलेआम सुरू आहेत. या टोळ्यांमध्ये काही बेकायदेशीर घुसखोर, तर काही पर्यटन व्हिसावर आलेले आहेत.
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर, महाविद्यालयांच्या परिसरात अमली पदार्थांच्या नशेत असलेले तरुण-तरुणी सहज दिसतात. पोलिसांनी केलेल्या छाप्यांमध्ये अनेक तरुण-तरुणी पकडले गेले आहेत. वाढत्या नशेच्या विळख्यात तरुण पिढी अडकत असून, हे अत्यंत धोकादायक चित्र आहे.
राज्यातील वाढत्या मागणीमुळे ड्रग्ज माफियांनी राज्यातच ड्रग्ज फॅक्टरी उभारण्याचा डाव आखला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर आदी जिल्ह्यांत ड्रग्ज निर्मितीचे प्रयत्न उघड झाले आहेत. पोलिसांनी वेळोवेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि त्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.
मुंबई, ठाणे, अलिबागसारख्या ठिकाणी होणाऱ्या रेव्ह पार्टीत सर्रास ड्रग्जची विक्री होते. या पार्टीत विदेशी ड्रग्ज, हाय प्रोफाईल कॉलगर्ल्स, आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचा सहभागही दिसून आला आहे. ड्रग्ज तस्करीसाठी डार्क वेबचा वापर वाढला असून, समुद्रमार्गे पाकिस्तान, अफगाणिस्तानमार्गे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ भारतात येतात.
बॉलिवूड आणि ड्रग्ज यांचा संबंध जुना आहे. ममता कुलकर्णी, विकी गोस्वामी, तसेच काही नामांकित कलाकारांची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहेत. पोलिसांच्या कारवाईत बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन वेळोवेळी उघड झाले आहे.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या अहवालानुसार, २०१९ मध्ये भारतात १८ दशलक्ष लोक ड्रग्जचे सेवन करत होते, तर २०२३ अखेर ही संख्या ३४ दशलक्षवर पोहोचली आहे. मुंबईत २०२४ मध्ये ४२४० कोटींचे ड्रग्ज जप्त झाले. वाढत्या मागणीमुळे ड्रग्ज माफियांनी राज्यातच फॅक्टरी उभारण्याचे प्रमाण वाढवले आहे.
बेकायदेशीर बांगलादेशी आणि नायजेरियन नागरिकांवर कठोर कारवाई आणि त्यांना भारतातून हद्दपार करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिस आणि प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन या ड्रग्ज माफियांवर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे, अन्यथा महाराष्ट्रातील तरुण पिढी आणि समाज गंभीर संकटात सापडू शकतो.