Mahayuti alliance crisis : ठाणे जिल्ह्यात महायुती तुटणार?

चार महापौर बनविण्याची भाजपची रणनीती
Mahayuti alliance crisis
file photo
Published on
Updated on

ठाणे : दिलीप शिंदे

स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्याने ठाणे जिल्ह्यात महायुती तुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सहापैकी किमान चार महापौर हे बनविण्यासाठी पालिकांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्याशिवाय भाजपापुढे पर्याय नाही. त्यात शिवसेना शिंदे गट देखील महायुतीमध्ये निवडणुका लढण्यास फारसा उत्सुक नाही. त्यामुळे कुठल्या मित्रपक्षासोबत गेल्यावर आपले अस्तित्व टिकू शकेल, या विवंचनेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अडकला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. सत्तेची वाटणी झाली असली तरी महायुतीमध्ये सारे आलबेल आहे, असे काही चित्र नाही. राज्यात भाजप हाच मोठा भाऊ असला तरी महापालिकांमध्ये आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाकडून होऊ लागला आहे.

युतीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाची भर पडल्याने आगामी महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या जागा वाटपावरून दुय्यम स्थान मिळण्याची आणि पक्ष वाढीस संधी मिळणार नसल्याची भीती भाजपच्या स्थानिक नेत्यांना सतावू लागली आहे. त्यात मुंबई, ठाण्यासारख्या जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेकडून आपणच मोठा भाऊ असल्याचा दावा वारंवार केला जात आहे.

ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका, दोन नगरपालिका, एक जिल्हा परिषद आणि दोन नगरपंचायती आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महापालिकेवर गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकत असून त्यांचे 80 पेक्षा अधीक नगरसेवक झाले आहेत.

131 जागा असलेल्या ठाण्यात महायुतीमध्ये निवडणूक लढविण्यास पक्ष वाढ खुंटण्याची शक्यता असल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा आग्रह भाजपचे आमदार संजय केळकर तसेच वनमंत्री गणेश नाईक यांनी धरला आहे. तर नवी मुंबई महापालिकेत भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांची एकहाती सत्ता असल्याने शिवसेनेचा कोंडमारा होत आहे. तशीच राजकीय परिस्थिती मीरा भाईंदर महापालिकेत असून एकहाती सत्ता असल्याने भाजपाला शिवसेनेच्या कुबड्यांची आवश्यकता नाही, असे भाजपसाठी सकारात्मक चित्र आहे.

मीरा भाईंदरमध्ये विरोधी पक्ष सलाईनवर असल्याने शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विरुद्ध भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वर्चस्वाचा संघर्ष पाहायला मिळतो. माजी आमदार पप्पू कलानी यांचे सुपुत्र ओमी कलानी यांच्या मदतीने भाजपने उल्हासनगर पालिकेत सत्ता काबीज केली. मात्र शिवसेनेने त्यांचा डाव उलटवत पुन्हा त्याच कलानीच्या मदतीने उल्हासनगर पालिकेत भगवा फडकवला होता. आता शिवसेना फूटल्याने भाजपला नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण-डोंबिवली महापालिकेनंतर उल्हासनगरमध्ये चौथा महापौर बसविण्याची संधी असल्याचे गणित भाजपच्या नेत्यांकडून मांडले जात आहे.

भिवंडी महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टीचे वर्चस्व असून शिवसेना-भाजपाचा संघर्ष करावा लागत आहे. अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेत शिवसेनेचे वर्चस्व आहे. बदलापूरमध्ये भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे यांच्यातील विस्तव कमीच होत नसल्याने युती होण्याची शक्यता धूसर आहे.

मुरबाड नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता असून शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. एकंदरीत ठाणे जिल्ह्यात भाजपला विस्तारण्यासाठी स्वबळाचा नाराच देणे कसा उपयुक्त आहे आणि युती केल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कसे अधिकच बळकट होतील हे स्थानिक नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेश नेतृत्वाला पटवून दिले जात असल्याने ठाणे जिल्ह्यातील महायुतीवर संक्रांत आली आहे.

कल्याणच्या सुभेदारीसाठी आग्रह

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी भाजपचीही तेवढीच ताकद आहे. राज्यात युती असताना देखील शिवसेनेचे 53 आणि भाजपचे 43 नगरसेवक हे स्वबळावर निवडून आले होते. त्यावेळी फडणवीस सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या खिशातील राजीनाम्याची चर्चा प्रचारात फारच रंगली होती.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा मनसेची ताकद अधिक आहे. शिवसेनेच्या विभाजनामुळे कल्याणची सुभेदारी अर्थात सत्ता काबीज करण्याची नामी संधी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना चालून आली आहे. त्याकरिता गेल्या निवडणुकीप्रमाणे स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news