

डोंबिवली शहर : प्रजासत्ताक दिन म्हणजे देशाच्या अस्मितेचा, परंपरेचा आणि सामर्थ्याचा भव्य उत्सव! दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडणारा हा सोहळा दरवर्षी संरक्षण दलाच्या शिस्तबद्ध संचलनासह विविध राज्यांच्या सांस्कृतिक वैभवाचं नेत्रदीपक दर्शन घडवतो. यंदा 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार संचलनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सादरीकरणाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं.
राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावत राष्ट्रीय पातळीवर मानाचा शिरपेच मिळवला. ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित हा चित्ररथ महाराष्ट्राच्या लोकसंस्कृती, अध्यात्म आणि लोकजीवनाचं प्रभावी दर्शन घडवणारा ठरला. याच कर्तव्यपथावर मुंबईतील कीर्ती एम. डुगर्सी विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांनी थेट राष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राची लोकसंस्कृती सादर करत अभिमानाचा क्षण अनुभवला.
‘भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्स’ या नामांकित संस्थेमार्फत निवड झालेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून महाराष्ट्राचा ठसा देशाच्या हृदयस्थानी उमटवला. कीर्ती महाविद्यालयातील पियुष सुषिला अशोक अंबुरे, सृष्टी स्वप्ना शरद वळंजू, स्वरांगी किशोर भेरे, सिद्धी लक्ष्मण मोरे आणि श्रेया श्रीकृष्ण वालावलकर या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लोकनृत्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचं सशक्त सादरीकरण केलं.
या सादरीकरणासाठी सोलापूर, मुंबई, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथून निवड झालेल्या 35 कलाकारांचा सहभाग होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेचं खऱ्या अर्थाने दर्शन घडलं. एक महिन्याहून अधिक काळ चाललेल्या सरावादरम्यान विद्यार्थ्यांना केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर देशभरातील विविध लोककला आणि नृत्यप्रकार जवळून पाहण्याची संधी त्या विद्यार्थ्यांना मिळाली. “भाषा वेगवेगळ्या होत्या, पण भावना एकसारख्या होत्या. खऱ्या अर्थाने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अनुभवता आलं,” असं विद्यार्थ्यांनी सांगितलं.
आव्हानांवर मात करत मिळवलेलं यश
विद्यार्थ्यांना जवळजवळ महिनाभर आधीपासून कडाक्याची थंडी, दीर्घ सराव सत्रे, काटेकोर वेळापत्रक आणि शिस्तबद्ध जीवनशैली अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र जबाबदारीची जाणीव, टीमवर्क आणि लोककलेप्रती असलेल्या निष्ठेमुळे प्रत्येक अडचण यशस्वीपणे पार करता आली. तसेच महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम क्रमांकावर घोषित होताच विद्यार्थ्याच्या आनंदाला उधाण आलं. “क्षणभर विश्वासच बसला नाही. आपल्या मेहनतीचं चीज झाल्याची भावना मनाला समाधान देणारी होती,” अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
गोंधळ लोकनृत्यातून अस्मितेचा जागर
यंदाच्या चित्ररथाची संकल्पना ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ अशी होती. गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव नसून लाखो लोकांच्या उपजीविकेचा आधार कसा बनतो, हे या चित्ररथातून दाखवण्यात आलं. अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोल-ताशांचा गजर आणि गणपती बाप्पाची भव्य मूर्ती यामुळे चित्ररथ उठावदार ठरला. कर्तव्यपथावर सादर करण्यात आलेला गोंधळ हा देवतांच्या उपासनेसाठी सादर होणारा पारंपरिक लोकनृत्य-नाट्य प्रकार असून, त्यातून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचं प्रभावी दर्शन घडलं.
कर्तव्यपथावर कलासाधनेची स्वप्नपूर्ती
कर्तव्यपथावर पाऊल टाकताना मनात प्रचंड उत्साहासोबतच थोडीशी धाकधूकही होती. देशासाठी काहीतरी करत असल्याचा अभिमान मन भरून आणणारा होता. प्रत्येक पावलागणिक जबाबदारीची जाणीव अधिक ठळक होत जात होती आणि तो ऐतिहासिक क्षण मनापासून जगण्याचा प्रयत्न सुरू होता. देशाच्या विविध कोपऱ्यातून आलेल्या कलाकारांसोबत सराव करताना अत्यंत समृद्ध आणि अविस्मरणीय अनुभव मिळाला. भाषा वेगळी असली तरी भावनांचा सूर सर्वांमध्ये एकसारखा होता, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. भविष्यातही महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठसा देशपातळीवर उजळवण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.