

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक सहा महिन्यांहून अधिक बंद असल्यास अशांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
बंदावस्थेत तसेच नादुरुस्त जलमापक तत्काळ बदलण्याबाबत ग्राहकांना कळविल्यानंतरही बहुतांशी ग्राहकांनी असे जलमापक अद्यापही बदललेले नाहीत. अशांचा पाणीपुरवठा 24 तासांची नोटीस बजावून खंडित करण्याची मोहीम पालिकेकडून सुरू करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागा मार्फत पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या शहरातील सर्व ग्राहकांना बंद असलेले तसेच नादुरुस्त असलेले जलमापक यंत्र नव्याने बसविण्याबाबत कळविल्याचे सांगण्यात आले. सध्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील सर्व मालमत्तांची पाणीपट्टी देयके काढण्यासाठी त्या-त्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या जलमापकाच्या नोंदी घेण्याचे काम सुरू केले आहे.
जलमापक यंत्राच्या नोंदी घेत असताना बहुतांशी ग्राहकांच्या जलजोडणीस बसविलेले पाण्याचे जलमापक यंत्र बंद, नादुरुस्त असल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. ज्या मालमत्तांचे जलमापक बंद किंवा नादुरुस्त आहेत, अशा ग्राहकांना पालिकेने मे ते ऑगस्ट या कालावधीत पाठविलेल्या पाणीपट्टी देयकात त्यांचे जलमापक सदोष असल्याचे नमूद केले होते. नंतरही सदोष जलमापक बदलले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
पाण्याचे देयक आकारण्याचा निर्णय
पालिकेकडून अशा ग्राहकांचे जलजोडणीचे जलमापक यंत्र बंद तसेच नादुरुस्त असल्यास त्यांना सरासरी पद्धतीने पाण्याचे देयक आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जलजोडणीचे जलमापक यंत्र 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत बंद असल्यास अशा ग्राहकांना 24 तासाआधी सूचना देऊन त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे.
नादुरुस्त यंत्र तत्काळ बदलावे
ही कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी बंद व नादुरुस्त जलमापक यंत्र तत्काळ बदलून नवीन जलमापक यंत्र बसवावे, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. जलमापक बदलल्याची माहिती अर्जाद्वारे विभागाला कळविण्यात यावी जेणेकरून जलमापकातील नोंदीनुसार देयक आकारणे शक्य होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.