Thane Incubation Center : तेलंगणाच्या धर्तीवर ठाण्यात उभे राहणार महा-हब इनोव्हेशन, इनक्युबेशन सेंटर

Thane Incubation Center : तेलंगणाच्या धर्तीवर ठाण्यात उभे राहणार महा-हब इनोव्हेशन, इनक्युबेशन सेंटर


मुंबई, तेलंगणा राज्यात उभारण्यात आलेल्या आणि देशासह जगभर प्रशंसा झालेल्या टी-हब या इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटरच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही जागतिक दर्जाचे महा-हब इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. या केंद्रामुळे राज्यातील युवा पिढीला स्टार्ट अप्स स्थापन करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ लाभणार आहे. यामुळे राज्यात रोजगार निर्मितिला चालना मिळणार आहे. (Thane Incubation Center)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील अंतरली, खोनी येथे २५ हेक्टर जमिनीवर केंद्र उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारकडून ५०० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या केंद्राच्या निर्मितीसाठी माहिती तंत्रज्ञान विभागाला नोडल विभाग म्हणून नियुक्त करण्यात आले असून उद्योग विभाग आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांना यासाठी मदत करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. (Thane Incubation Center)

तेलंगणाच्या धर्तीवर राज्यात केंद्र उभारण्यासाठी महिनाभरापूर्वी राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी टी-हब संकुलांना भेट दिली होती. त्यावेळी आम्ही या केंद्राचे विस्तृत सादरीकरण केले होते. या केंद्रासाठी कंपनी स्थापन करून हैद्राबाद येथील तंत्रज्ञान व्यवस्थापन, विधी क्षेत्रातील राष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी नेमले. आमचे हेच मॉडेल महाराष्ट्रात राबविले जात आहे. याचा आम्हाला आनंद आहे. महाराष्ट्राला यासंदर्भात काहीही मदत लागल्यास तेलंगणा नक्की करेल, असे टी-हबचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश अँथनी यांनी 'दै.पुढारी'शी हैद्राबादहून बोलताना सांगितले.

Thane Incubation Center : कसे असेल महा-हब?

महा हब इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटर चालविण्यासाठी ना -नफा, ना- तोटा तत्वावर चालणारी कंपनी स्थापन करण्यात येईल. या कंपनीत ९ संचालक असतील. उद्योग, उपक्रम, भांडवलदार, खासगी इक्विटी फंड या क्षेत्रातील कंपन्यांचे योगदान प्रत्येकी १० कोटी असेल. आयआयटी मुंबई, राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबई, आयआयएम मुंबई या शिखर संस्थाचे अधिष्ठाता या दर्जाचे प्रत्येकी एक असे एकूण तीन संचालक तसेच प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान आणि सिडबीचे एक प्रतिनिधी असे संचालक मंडळ असेल. प्रशासकीय आणि तांत्रिक बाबी हाताळण्यासाठी त्या – त्या क्षेत्रातील अनुभवी व तज्ञांची कंपनीच्या मुख कार्यकारी अधिकारी, मुख्य इनोव्हेशन अधिकारी, मुख्य कार्यचालन अधिकारी इत्यादी दर्जाच्या व्यवस्थापकांची आणि आवश्यकतेप्रमाणे कर्मचारी यांची कंत्राटी आधारावर भरती केली जाईल.

अंतरली, खोनी (जि. ठाणे) येथे २५ हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारणार 

अंतरली, खोनी (जि. ठाणे) येथे २५ हेक्टर गायरान जमिनीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. प्रकल्प उभारणीसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याकरीता ठाणे जिल्हा नियोजन व विकास मंडळ यांनी ठाणे जिल्हा परिषदेसाठी इनोव्हेशन निधी म्हणून निश्चित केलेले ५ कोटी बीज भांडवल म्हणून महाहब कंपनीला दिले जाईल. या केंद्राच्या निर्मितीसाठी धोरणात्मक मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल.

कसे आहे टी-हब?

देशातील सर्वोत्तम इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटर म्हणून तेलंगाणा सरकारने स्थापन केलेल्या टी-हबचा सन्मानाने उल्लेख केला जातो. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे चिरंजीव आणि त्या राज्याचे माहिती तंत्रज्ञान, इनोव्हेशन मंत्री के.टी.रामाराव (केटीआर) यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. केटीआर यांनी विदेशातून अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेतले असून त्यांच्या संकल्पनेनुसार विकसित करण्यात आलेला टी-हब प्रकल्प हा हैद्राबाद शहराच्या सीमेवरील रायदूर्ग येथील हायटेक सिटीत आहे.
टी-हब, टी-वर्क आणि डिजिटल इनोव्हेशन सेंटर असे एकत्र मिळून ३ संकुलांमध्ये हे इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटर आहे. सध्या टी-हब आणि टी वर्क संकुल ८ लाख चौरस फूट क्षेत्रफळात कार्यरत आहे. डिजिटल इनोव्हेशन सेंटरचे तिसरे संकुल विकसित होत असून येथे १५ लाख चौरस फूट क्षेत्रफळ जागा डिजिटल, अनिमेशन क्षेत्रातील उद्योगांना उपलब्ध होणार आहे. २०२४ मध्ये डिजिटल इनोव्हेशन सेंटर कार्यरत होणार असून त्यानंतर आमचे इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटर हे जगातील सर्वात मोठे केंद्र ठरेल. बिहार सरकारनेही आम्हाला इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटर उभारण्यासाठी पाचारण केले आहे, असेही अँथनी यांनी सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news