डॉ. सचिन जायभाये
लेप्टोस्पायरोसिस हा प्रामुख्याने प्राण्यांचा संसर्गजन्य आजार असून पर्यावरणातील बदल, माणसांचे राहणीमान आणि शेतीच्या विशष्ट पद्धतीमुळे तो माणसांना होतो. हा संसर्ग जंगली प्राण्यांकडून पाळीव प्राण्यांना व पाळीव प्राण्यांकडून माणसांना होतो. अनेक प्राण्यांच्या शरीरात लेप्टोस्पायरा जंतू सहवास करतात. त्यामध्ये उंदीर व घुशीसारखे रोडंट्स, श्वान, मांजर, डुक्कर, गायी, म्हशी व शेळ्या-मेंढ्यांसारखे पाळीव प्राणी, सिल्व्हर फॉक्स, रेप्टाईल्स यांची गणना होते. हे प्राणी लेप्टोस्पायरोसिसचे संभाव्य संसर्गस्रोत समजले जातात.
साहजिकच भातशेती करणारे शेतकरी, ड्रेनेज सिस्टिम्समध्ये सफाई करणारे कामगार, गुराखी, दुग्ध व्यवसायातील कामगार, डुक्कर पाळणारे लोक, ऊस तोडणारे कामगार, श्वान पाळणारे लोक, व्हेटर्नरी डॉक्टर, स्टाफ, खाण कामगार इत्यादींना हा आजार होण्याची शक्यता अधिक असून हे या आजाराबद्दल जोखमीचे गट समजले जातात.
कोकणात भातशेती हा मुख्य व्यवसायांपैकी एक आहे. भातशेतीची लावणी व मशागत यासाठी साचलेल्या पाण्यात उभी राहून काम करावे लागते हे आपण सगळे जाणतोच. साचलेल्या पाण्यात लेप्टोस्पायरोसिसचे जंतू असतात त्यामुळे कोकणात भातशेतीच्या लागवड काळात लेप्टोस्पायरोसिसची लागण होण्याचे प्रमाण अधिक असते.
अॅडॉल्फ वील या जर्मन शास्रज्ञाने 1886 साली सर्वप्रथम लेप्टोस्पायरोसिस या आजाराचे वर्णन केले म्हणून त्याला वील्स डिसिज असेही एक नाव आहे. हा आजार लेप्टोस्पायरा या जंतूच्या संसर्गामुळे होतो. लेप्टोस्पायरोसिस प्रामुख्याने व्हर्टीब्रेट्स म्हणजे कणा असलेल्या प्राण्यांमध्ये आढळून येतो. लेप्टोस्पायरोसिस हा प्राण्यांकडून माणसांना होणारा आजार असून त्याचे प्रमाण उष्णकटीबंधात व विषुवृत्तीय प्रदेशात जास्त आढळते. लेप्टोस्पायरोसिस प्राण्यांच्या मुत्राशी अथवा मूत्र प्रदूषित पाण्याशी माणसांचा प्रत्यक्ष संपर्क आल्यास हा आजार फैलावतो.
सर्वसाधारण उष्णकटिबंधीय प्रदेशात लेप्टो अधिक प्रमाणात आढळतो. 1995 ते 2000 दरम्यान थायलंडमध्ये तर 1998 मध्ये अमेरिकेतही लेप्टोने थैमान घातले होते. भारतात सर्वप्रथम 1929 साली अंदमान व निकोबार बेटांवर लेप्टोस्पायरोसिसचा रुग्ण आढळला तरी 1980 पर्यंत भारतात लेप्टोचे प्रमाण तुरळक होते. भारतात लेप्टोस्पायरोसिस आजार साथीच्या व तुरळक स्वरूपात आढळतो. 1980 साली तमिळनाडू, कर्नाटक, नागपूर येथे तर 1997 साली सुरतमध्ये लेप्टोस्पायरोसिसची मोठी साथ निदर्शनास आली. ऑक्टोबर 1999 मध्ये ओरिसात आलेल्या चक्रीवादळानंतर ताप व फुफ्फुसांमध्ये रक्तस्राव अशी लक्षणे रुग्णांत आढळून आली. जे लेप्टोची लक्षणे असल्याचे तपासणीत लक्षात आले.
लेप्टोचा संसर्ग 10 ते 39 वर्षे वयोगटातील व्यक्तींना होण्याची शक्यता अधिक असते. अनवाणी चालणे, उघड्यावर शौचास बसणे, अस्वच्छ विहिरी, तलावात पोहणे, साचलेल्या पाण्यातून चालणे अथवा काम करणे, सांडपाणी व कचर्याची सदोष विल्हेवाट इत्यादी घटक या आजाराच्या फैलावास कारणीभूत ठरतात. बकाल व अनियोजित शहरीकरणामुळेही लेप्टोच्या प्रचारास चालना मिळताना दिसते. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात प्राण्यांचे लेप्टोस्पायरा जंतुमुळे दूषित झालेले मूत्र मिसळलेले असण्याची शक्यता असते. अशा दूषित पाण्याचा शरीराशी संपर्क आल्यास लेप्टो संसर्गाची शक्यता असते. म्हणून पावसाळ्यात व पूरपरिस्थितीत लेप्टो साथीची शक्यता अधिक असते.
साथींच्या काळात कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला या रोगाची लागण होऊ शकते. मळसुत्राच्या आकाराचे लेप्टोस्पायरा जंतू पातळ, चलनशील असतात. हे जंतू अतिसूक्ष्म असल्याने साध्या सुक्ष्मदर्शक यंत्राखाली सहज दिसत नाहीत. डार्क फिल्ड इल्युमिशनेशन व सिल्व्हर स्टेनिंग करून हे जंतू पाहावे लागतात. डार्क फिल्ड मायक्रोस्कापीतून हे जंतू चंदेरी धाग्यांच्या आकाराचे दिसतात. या जंतूंचे 200 हून जास्त उपप्रकार आहेत.