

डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या एनआरसी कॉलनी परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्या फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिसरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या जेरबंद झाला आहे. बिबट्या आल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसह विद्यार्थी आणि पालकांच्या मनात भितीचे काहूर माजले आहे.
बंद पडलेल्या एनआरसी कंपनीच्या कॉलनी परिसरात सद्या जंगल माजले आहे. याच परिसरात एनआरसीच्या पडीक इमारती, हॉस्पिटलसह शाळा देखील आहे. सद्या या भागात मानवी वस्ती नसल्यामुळे परिसरात घनदाट जंगल पसरले आहे. त्यातच एनआरसी शाळेच्या परिसरात बिबट्या आढळून आल्याने परिसरातील रहिवाशांसह शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाळा प्रशासनाने या संदर्भात विद्यार्थ्यांसह पालकांना सूचना दिल्या आहेत. शाळेत पाठवताना काळजी घ्यावी अशा सूचना केल्या आहेत. दरम्यान वनविभागाने या परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शनिवारी सकाळपासून वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्व परिसर पिंजून काढला. तथापी बिबट्या वा त्याच्या पाऊलखुणा कुठेही आढळून आल्या नाहीत. त्यामुळे हा बिबट्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात निघून गेला असल्याची शक्यता देखिल वनविभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मात्र तरी देखील वनविभागाचे अधिकारी सतर्क झाले आहेत. परिसरातील रहिवाशांनी या संदर्भात काळजी घेण्याचा सूचना दिल्या आहेत.