

AI Cameras to Prevent Tiger Attacks in Maharashtra Villages
नागपूर : आता मध्यरात्रीच्या शांततेत गावात शिरणाऱ्या वाघ किंवा बिबट्याची चाहूल लागताच, गावकरी झोपेतून जागे होतील. कारण आता त्यांना सावध करण्यासाठी माणसांची नव्हे, तर कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चालणारे कॅमेरे आणि त्याला जोडलेले सायरन २४ तास पहारा देणार आहेत. विदर्भातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने हा अभिनव आणि तंत्रज्ञान-आधारित उपाय योजला आहे.
नागपूर वनविभाग, पेंच, ताडोबा-अंधारी आणि नवेगाव-नागझिरा या व्याघ्र प्रकल्पांच्या सीमेलगतच्या गावांमध्ये वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. अनेक निष्पाप नागरिकांना यात आपला जीव गमवावा लागला आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र एआय अँड रोबोटिक्स व्हेंचर्स फॉर एनहान्सिंग लाइव्हलीहूड' (MARVEL) या कंपनीसोबत शनिवारी (दि.12) नागपुरात एका महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
यावेळी राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तसेच वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते. 'मार्व्हल'चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार आणि संबंधित व्याघ्र प्रकल्पांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये या कराराचे आदान-प्रदान झाले.
कसे काम करणार हे तंत्रज्ञान?
या करारानुसार, व्याघ्र प्रकल्पांच्या भोवतालच्या गावांच्या सीमेवर एकूण ३,१५० अत्याधुनिक एआय-कॅमेरे बसवले जातील. या कॅमेऱ्यांमध्ये वाघ आणि बिबट्या यांना स्वतंत्रपणे ओळखण्याची क्षमता असलेले विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. जेव्हा एखादा वाघ किंवा बिबट्या या कॅमेऱ्याच्या निगराणी क्षेत्रात येईल, तेव्हा कॅमेरा त्याला तात्काळ ओळखेल. त्याच क्षणी, गावातील दाट वस्तीच्या ठिकाणी वायरलेस प्रणालीद्वारे जोडलेले सायरन आपोआप वाजू लागतील. यामुळे गावकऱ्यांना त्वरित धोक्याची सूचना मिळेल आणि ते स्वतःचा बचाव करण्यासाठी सावध होऊ शकतील. कृत्रीम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर करुन अपघाताचे, गुन्ह्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक डॉ. किशोर मानकर, क्षेत्र संचालक डॉ.प्रभुनाथ शुक्ल, आर. जयराम गौडा, उपवन संरक्षकविनीत व्यास, उपसंचालक अक्षय गजभिये, सहाय्यक वनसंरक्षक पुजा लिंबगावकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कॅमेऱ्यांचे विभागणी क्षेत्र
या प्रकल्पांतर्गत खालीलप्रमाणे कॅमेरे आणि सायरन यंत्रणा उभारली जाईल:
नागपूर वनक्षेत्र: १,१४५ कॅमेरे
पेंच व्याघ्र प्रकल्प: ८७५ कॅमेरे
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प: ६०० कॅमेरे
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प: ५२५ कॅमेरे