

नाशिक : युवा पिढी अनेक आव्हानांना सामोरे जात आपल्या प्रयोगशीलतेने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्राला अधिक समृद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारतातील अग्रगण्य 'कृषीथॉन' या प्रदर्शनाच्या व्यासपीठावरून विविध श्रेणीत कार्य करणाऱ्या कर्तबगारांचा सन्मान करण्यात येणार आहे. (Krishithon India’s Largest Agriculture Expo & Agri Exhibition)
यामध्ये प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार, प्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्कार, प्रयोगशील कृषीविस्तार कार्य, प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार (पुरुष व महिला गट) अशा चार गटांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. यापैकी प्रयोगशील युवा कृषीसंशोधक पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती ह्युमन सर्व्हिस फाउंडेशनचे अध्यक्ष संजय न्याहारकर यांनी दिली.
प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कारात डॉ. माधवी सोनेने (नाशिक), डॉ. रोशन शिंदे (वाशीम), डॉ. सायली साळुंखे (नाशिक), डॉ. विशाखा बागूल (सटाणा), डॉ. सोज्वळ शिंदे (वाघोली), डॉ. शोभा सुरभैय्या (अहिल्यानगर), रामचंद्र नवत्रे (सातारा), शिवम मद्रेवार (सांगली), डॉ. सोनम मेहत्रे (कोल्हापूर), डॉ. प्रियांका खोले (नांदेड), अथर्व कुलकर्णी (पुणे) यांची निवड झालेली आहे.
प्रयोगशील युवा कृषी यांत्रिकीकरण संशोधन नवउद्योजक श्रेणीत तिरुपती बालाजी दिघोळे (सिन्नर), आविष्कार अनार्थे (नाशिक) यांची निवड झाली असून, प्रयोगशील कृषी यांत्रिकीकरण संशोधक शेतकरी पुरस्कारासाठी गणू चौधरी (धुळे) यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या पुरस्कारार्थींना हे पुरस्कार नाशिकच्या ठक्कर्स मैदान येथे २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या कृषीथॉन प्रदर्शनाच्या सतराव्या आवृत्तीमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.