Maharashtra Infrastructure Projects : कोकणला दुहेरी भेट; महामार्गाला गती, रत्नागिरीत शीतगृह

३८८ किमीचा द्रुतगती महामार्ग; हापूस, काजू, कोकमच्या साठवणुकीसाठी दोन हजार टन क्षमतेची सुविधा
Maharashtra Infrastructure Projects
Cold Storagepudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंब्रा : मुंबई ते गोवा प्रवास जलद करण्यासाठी प्रस्तावित कोकण द्रुतगती महामार्गाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याचे (डीपीआर) काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठेवले आहे. सुमारे ३८८ किलोमीटर लांबीचा हा सहापदरी महामार्ग अंदाजे २५ हजार कोटी रुपये खर्चाचा असून, तो पूर्ण झाल्यास मुंबई ते कोकण प्रवासाचा वेळ तीन ते चार तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

दुसरीकडे, कोकणातील कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी रत्नागिरी येथे दोन हजार टन क्षमतेचे शीतगृह उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक आणि कृषी व्यापाराला चालना मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Infrastructure Projects
IIT Bombay : आयआयटी मुंबईतील राजकीय हस्तक्षेप थांबवा!

राज्य सरकारने २०२० मध्ये कोकण द्रुतगती महामार्गाची घोषणा केली होती. मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना प्रवासासाठी अधिक वेळ लागतो. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र द्रुतगती महामार्गाची संकल्पना पुढे आली. नव्या संरेखनानुसार महामार्गासाठी सुमारे चार हजार २०५ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. डीपीआर तयार झाल्यानंतर तो राज्य सरकारच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.

या महामार्गाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाशी तसेच विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशी जोडण्याचे नियोजन आहे. मात्र, जोडणीची ठिकाणे अद्याप अंतिम झालेली नाहीत. महामार्गामुळे कोकणातील पर्यटन, व्यापार आणि मालवाहतुकीला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, कोकण रेल्वे आणि केंद्रीय वखार महामंडळाच्या (सीडब्ल्यूसी) करारानुसार रत्नागिरी येथे दोन हजार टन क्षमतेचे शीतगृह उभारण्यात येणार आहे. हापूस आंबा, काजू, कोकम, मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि अन्य नाशवंत उत्पादनांच्या साठवणुकीसाठी ही सुविधा उपयोगी ठरणार आहे. प्रकल्पासाठी कोकण रेल्वे जमीन उपलब्ध करून देणार असून, सीडब्ल्यूसी निधी पुरवणार आहे. शीतगृहाचे बांधकाम १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Maharashtra Infrastructure Projects
Mathadi Workers Weight Limit : बाजार समित्यांमध्ये पन्नास किलोपेक्षा जास्त वजनाची गोणी उचलण्यास बंदी!

हापूस आंब्याचा हंगाम मर्यादित असल्याने शीतगृहामुळे आंब्याचा गर आणि अन्य कृषी उत्पादनांची साठवणूक करून मागणीनुसार बाजारपेठेत पुरवठा करणे शक्य होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news