

नीती मेहेंदळे
कोल्हापूर अनेक गोष्टींसाठी, स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूर म्हटलं की, मिसळ, तांबडा पांढरा रस्सा. तसंच कोल्हापूर आलं की, महालक्ष्मी दर्शन घेतलं नाही तर आपली कोल्हापूर स्वारी व्यर्थ. पन्हाळा किल्ला हे अजून एक कोल्हापूरचं वैशिष्ट्य. त्याच्या अगदी शेजारच्या डोंगरावर पश्चिमेला ठाणं असलेला ज्योतिबा हेही एक कोल्हापूरचं आकर्षण.
ज्योतिबा मंदिराचा इतिहास कोल्हापूर आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी देखील जोडला गेला आहे. याचं मूळ मंदिर कोणी बांधलं याबद्दल इतिहास धूसर आहे, पण ते कराडजवळील किवल गावातील भक्त नवजी सया यांनी बांधले होते, असा अस्पष्ट धागा सापडतो. पण, आत्ताचं उभं मंदिर मात्र शिंदे सरदारांनी बांधलं आहे, हे निश्चित. इ.स. 1730 मध्ये ग्वाल्हेरचे राणोजी शिंदे यांनी मूळ मंदिराचा एका भव्य ठिकाणी जीर्णोद्धार केला.
संपूर्ण ज्योतिबा किंवा केदारेश्वर मंदिर इ.स. 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधलं. रामलिंग मंदिर इ.स. 1780 मध्ये मालजी पन्हाळकर यांनी बांधलं आणि यमाई मंदिर, जमदग्नी तलाव राणोजी शिंदे यांनी बांधले असा संदर्भ सापडतो. शिंदेंच्या आश्रयामुळे ज्योतिबा मंदिर एक मजबूत आणि सुबकपणे बांधलेले मंदिर ठरलं आहे. मंदिरातले स्तंभ, नंदी आणि इतर सजावटीच्या तपशीलांवरून हे जाणवतं.
सुमारे 3125 फूट उंचीवर असलेलं हे ज्योतिबा मंदिर महाराष्ट्रातील सर्वात आदरणीय तीर्थस्थळांपैकी एक समजलं जातं. ते कोल्हापूरपासून सुमारे 18 किमी अंतरावर असलेल्या पन्हाळाजवळच्या वाडी रत्नागिरीच्या टेकड्यांमध्ये वसलेलं आहे.
त्याच्या कथा बहुतेकदा स्थानिक लोककथा आणि प्रादेशिक कथांशी गुंतलेल्या असतात. पौराणिक कथेनुसार, ज्योतिबाचा जन्म देवी आदिशक्तीचा अवतार असलेल्या देवी विमलाम्बुजाच्या हातातून निघालेल्या ज्वालेतून झाला होता. तिने त्यांच्या अहंकाराला नम्र करण्यासाठी मूळ देवांपेक्षा 100 पट जास्त शक्तिशाली त्रिदेवांचा (ब्रह्मा, विष्णू आणि शिव) आणखी एक संच निर्माण केला. जेव्हा ती त्यांच्या मदतीसाठी हाक मारेल तेव्हा तिने त्यांना पुन्हा येण्याचा आदेश दिला. म्हणून ज्योतिबाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार मानलं जातं.
त्यांचा जन्म रत्नासुर आणि रक्तभोज या राक्षस बंधूंचा नाश करण्यासाठी झाला होता, ज्यांनी या प्रदेशात दहशत निर्माण केली होती. तेव्हा देवी महालक्ष्मीने करवीरकडे परत जाण्याचा निर्णय घेतला आणि या त्रिदेव संचाला मदतीसाठी बोलावलं. तो तिच्या हातात एका आठ वर्षांच्या मुलाच्या रूपात एका ज्वालेच्या रूपात दिसला, ज्याच्या हातात तलवार, ढोल, त्रिशूळ आणि अमृतकलश अशी लांछनं होती. त्याचं नामकरण ज्योतिबा असं केलं गेलं, ज्याचा अर्थ “तेजस्वी” असा होतो.
“ज्योतिबा” हे नाव संस्कृत शब्द “ज्योति”पासून आले आहे, ज्याचा अर्थ प्रकाश आहे आणि “बा” हा शब्द प्रेमाचा आहे. अशाप्रकारे, ज्योतिबा चा अर्थ “प्रिय प्रकाश” किंवा “दैवी प्रकाश” असा होऊ शकतो. हे नाव त्याच्या भक्तांसाठी प्रतीकात्मक संरक्षणाचा आणि आशेचा किरण ठरतं. ज्योतिबाला वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आणि ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं.
काही भागात, त्याला केदारेश्वर म्हणून संबोधलं जातं, तर काही भागात त्याला मल्हारी मार्तंड म्हणतात. त्याला शिव-पार्वतीचा पुत्र कार्तिकेय (स्कंद) याचा अवतार देखील मानलं जातं. त्याला खंडोबा, मलाण्ण, ज्योतिर्लिंग, मार्तंड भैरव किंवा सूर्य अशी इतर नावंदेखील आहेत. प्रत्येक नाव ज्योतिबाच्या दैवी व्यक्तिमत्त्वाचा एक अद्वितीय पैलू अधोरेखित करतं, त्याच्या संरक्षणात्मक गुणांपासून ते त्याच्या वैश्विक महत्त्वापर्यंत. ज्योतिबाला सामान्यतः एक योद्धा देव म्हणून चित्रित केलं जातं, बहुतेकदा घोड्यावर स्वार होऊन तलवार चालवताना दाखवलं जातं.
कोल्हापूरची प्रमुख देवता देवी महालक्ष्मीने राक्षसांना पराभूत करण्यासाठी ज्योतिबाची मदत घेतली. त्याने दैत्य व त्यांच्या साथीदारांशी युद्ध केलं आणि त्यांना आपल्या शस्त्रांनी मारलं. त्याने महालक्ष्मीला राक्षसांशी झालेल्या युद्धात मदत केली आणि प्रदेशात शांती आणि समृद्धी पुनर्स्थापित केली. ब्रह्मा, विष्णू आणि शिव - दैवी त्रिमूर्तीचे अवतार मानले जाणाऱ्या ज्योतिबाला समर्पित मंदिराचं पौराणिक महत्त्व प्रचंड आहे.
दुसरी अशी आख्यायिका आहे की, ज्योतिबाने देवी महालक्ष्मीला कोल्हासुर राक्षसाशी झालेल्या महायुद्धात मदत केली आणि त्याचं नाव देवी संप्रदायाशी कायमचं कोरलं गेलं. मुख्य मंदिर ज्योतिबाला समर्पित आहे आणि ज्योतिबाची मूर्ती चतुर्भुज आहे. मूर्ती घोड्यावर बसलेली आहे, जी सूर्यदेवाशी असलेल्या त्याच्या संबंधांचं प्रतीक आहे. ज्योतिबाशी संबंधित सामान्य प्रतीकांमध्ये तलवार, घोडा आणि त्रिशूळ यांचा समावेश आहे.
तलवार त्याच्या युद्ध पराक्रमाचे आणि वाईटावर विजय मिळविण्याच्या क्षमतेचं प्रतिनिधित्व करते, तर घोडा वेग आणि चपळतेचे प्रतीक आहे. हिंदू प्रतिमाशास्त्रात एक सामान्य प्रतीक असलेला त्रिशूळ, त्याचे दैवी अधिकार आणि शक्ती दर्शवतो. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराभिमुख असलेली ही प्रतिमा तिच्या संरक्षणासाठी दक्षिणेकडे तोंड करून आहे, अशी मंदिर बांधणाऱ्या भक्तांची भावना आहे. मंदिराशी संबंधित विधी आणि कथांवर स्थानिक परंपरांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. मंदिराला अग्निपूजेशी जोडणारे अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत.
ज्योतिबा हे महाराष्ट्रातील अनेक मराठा आणि इतर समुदायांचं कुलदैवत आहे. बहुतेकदा एक शक्तिशाली आणि परोपकारी देवता म्हणून चित्रित केलेला ज्योतिबा विशेषतः शेतकरी, मेंढपाळ आणि कामगारवर्गातही पूजनीय आहे. मराठा साम्राज्याशी असलेल्या मंदिराचे मजबूत संबंध त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणखी वाढवतात.
ज्योतिबा मंदिर हे कोल्हापूरच्या आसपास विकसित झालेल्या तत्कालीन स्थापत्य शैलीचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. मंदिराच्या परिसराला एक भव्य दगडी प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या आत अनेक लहान दीपमाळा आहेत, हे एक मराठा मंदिर स्थापत्याचं वैशिष्ट्य.
या दीपमाळा उत्सव आणि विशेष प्रसंगी प्रकाशित केल्या जातात, ज्यामुळे एक नेत्रदीपक दृश्य निर्माण होतं. मुख्य मंदिराच्या स्थापत्यावर हेमाडपंती आणि दख्खन शैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. ते कोल्हापूरभोवती विकसित झालेल्या स्थापत्य स्वरूपाचं प्रतिनिधित्व करतं. मंदिराच्या भिंती साध्या आहेत आणि त्यात रथपट्ट असलेले सरळसोट शिखर आहे.
मध्ययुगात मंदिर पूर्ण झालं म्हणून मूर्तिकाम व अलंकरण मर्यादित स्वरूपाचं असलं तरी एकूण बांधकाम भव्य झालं आहे. त्याच्या भिंती आणि खांब पौराणिक कथा, फुलांचे आकृतिबंध आणि अनेक भौमितिक नमुने दर्शविणाऱ्या कोरीवकामांनी सजवलेले आहेत. स्थानिक पातळीवर मिळवलेल्या चुनखडीचा वापर त्यात दिसून येतो. मंदिराच्या शिखरांवर उंच शिखरावर देवता, देवी आणि काल्पनिक प्राण्यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. हे कोरीव काम आपल्याला सुरेख कारागिरीचे दर्शन घडवतं. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आज गाडीरस्ता थेट मंदिरापर्यंत नेत असला तरी मूळ जुनी पायवाट अजूनही शाबूत आहे. त्यामार्गे मंदिराला 100 पायऱ्या आहेत.
हा मार्ग आजूबाजूच्या परिसराचं दर्शन घडवणारा आणि रमणीय आहे. मंदिर संकुलात एक मोठं प्रांगण आणि ज्योतिबा, देवी यमाई आणि भगवान केदारेश्वर यांना समर्पित तीन वेगवेगळी मंदिरं आहेत. ती महत्त्वाची. या मंदिराशिवाय मंदिर संकुलात रामलिंग, रामेश्वरी, सटवाई अशी इतर मंदिरंही आहेत. संकुलातील यमाई मंदिर त्यामानाने लहान आहे आणि त्यात आयताकृती सभामंडप आणि सभा- मंडपामध्ये नियमित आकारांनी आधारलेलं छत आहे.
कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या इतिहासात या मंदिराने अनेक घटना आणि घडामोडी पाहिल्या आहेत. हे मंदिर नाथ संप्रदायाचे देखील आहे आणि या मंदिरात काही चिन्हे आणि आकृतिबंध आहेत, जे नाथ परंपरा प्रतिबिंबित करतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात ज्योतिबा पुजला जातो. मंदिरात गुलाल अर्पण करण्याची प्रथा आहे आणि भाविकांनी गुलाल उधळल्यामुळे, संपूर्ण मंदिर परिसर गुलाबी दिसतो. रविवार हा ज्योतिबाला समर्पित दिवस असल्याने, तिथे दर रविवारी गर्दी असते.
याशिवाय चैत्र व वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देव ज्योतिबा मोठ्या थाटामाटात त्यांची बहीण यमाईला भेट देतात. या उत्सवादरम्यान मंदिराचे उंच दीपमाळ (दिव्याचे मनोरे) भव्य दृश्ये निर्माण करतात. यमाईचे मंदिर ज्योतिबा संकुलापासून काही अंतरावर आहे. मिरवणुकीत चांगभलं, चांगभलं असा नारा दिला जातो आणि मिरवणूक यमाईपर्यंत पोहोचते, जिथे मंदिराचे दरवाजे काही काळासाठी बंद केले जातात. उत्तरेस मानपाडळेचा समर्थस्थापित मारुती, पूर्वेला पोहाळेची लेणी आणि पश्चिमेस पन्हाळा किल्ला हाकेच्या अंतरावर असा समृद्ध शेजार वाडी रत्नागिरीला लाभला आहे.