

डोंबिवली : सोसायटी स्थापन झाली त्याला दोन वर्षे उलटली, आता सोसायटीकडे ताबा आहे, तरीही बिल्डर या सोसायटीतील रहिवाशांकडून दरमहा मेंटेनन्सच्या नावाखाली पैसे उकळत असतो. यावरून खोणी क्राऊन तळोजा येथील रहिवाशांचा संतापाचा कडेलोट झाला. बिल्डरकडून अन्यायकारक सुलीला विरोध करण्यासाठी रविवारी तब्बल २ हजार ५०० रहिवासी रस्त्यावर उतरले. क्राऊन प्रकल्पापासून बिल्डरच्या कार्यालयापर्यंत भर उन्हात काढण्यात आलेल्या मूक मोर्चादरम्यान रहिवाशांनी १५ दिवसांचा अल्टिमेट दिला. तरीही तोडगा न निघाल्यास उपोषणाला बसणार असल्याचा आंदोलनकर्त्या रहिवाशांनी इशारा दिला.
क्राऊन तळोजा परिसरात लोढा पलावा गृहसंकुल उभारणीचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्यापैकी ऑर्किड सोसायटी ही सुमारे २५०० घरांची असून, ती राज्यातील सर्वात मोठ्या सोसायट्यांपैकी मानली जाते. या सोसायटीचा ताबा रहिवाशांकडे गेल्याला दोन वर्षे उलटली आहेत. तरीही बिल्डरची कंपनी रहिवाशांकडून मेंटेनन्सच्या नावाखाली पैसे उकळत आहे. शिवाय सोसायटीमार्फतही स्वतंत्र शुल्क घेतले जात असल्याने रहिवाशांवर दुहेरी आर्थिक भार पडत आहे.
दोन ठिकाणांहून वेगवेगळे मेंटेनन्स भरून आमचे कंबरडे मोडले आहे. आम्ही सर्वसामान्य मध्यमवर्गीय रहिवासी आहोत. म्हाडा आणि बिल्डरकडून घेतलेल्या घरांवर आधीच कर्जाच्या हप्त्यांचा बोजा आहे. आता दरमहा दोन ठिकाणांहून मेंटेनन्सच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याने आमच्या कष्टाच्या कमाईची लूट सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या रहिवाशांनी केला.
रविवारी सकाळी रहिवाशांनी एकत्र येऊन शांततेत मूकमोर्चा काढला. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. तरीही पोलिस आणि बिल्डरच्या बाऊन्सर्सनी मोर्चा अडविण्याचा प्रयत्न केला. आमचा मोर्चा शांततेत आहे. मूकमोर्चा असूनही आमच्या मागण्या मांडू देत नाही, हा तर लोकशाहीचा खून असल्याची प्रतिक्रिया रहिवाशांमधून उमटली. यावेळी वादवादीचा प्रकारही झाला. मात्र रहिवाशांच्या निर्धारासमोर पोलिसांनी बिल्डरच्या बाऊन्सर्सना सूचना देऊन माघार घेतली. त्यामुळे रहिवाशांचा मूकमोर्च पुढे मार्गस्थ झाला. हा मोर्चा बिल्डरच्या कार्यालयावर जाऊन धडकला.
येत्या १५ दिवसांत तोडगा काढा, अन्यथा आंदोलन चिघळणार असल्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी बिल्डरला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हकनाक आकारले जाणारे शुक्ल बिल्डरने बंद करावे, अन्यथा १५ दिवसानंतर त्याचे परिणाम दिसून येतील. दिलेल्या मुदतीत जर का तोडगा न काढल्यास आम्हाला उपोषणाचे हत्यार उपसावे लागणार असल्याचाही इशारा मोर्चेकरी रहिवाशांनी दिला. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते महेश ठोंबरे आणि सोसायटीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, संबंधित बिल्डरकडून मनमानी वसुली सुरू आहे. अन्यायकारक वसुलीला विरोध करणे, हा आमचा अधिकार आहे. महारेराकडेही आम्ही या संदर्भात दाद मागणार आहोत, असेही ठोंबरे म्हणाले.
गृहनिर्माण संस्थांच्या नियमांनुसार सोसायटी स्थापन झाल्यानंतर मेंटेनन्स शुल्क आकारण्याचा अधिकार केवळ सोसायटीकडेच असतो. बिल्डरचा त्यानंतर संबंध राहत नाही. इथे बिल्डर या रहिवाशांकडून विनाकारण पैसे उकळत आहे हे पूर्ण बेकायदेशीर आणि नियमांच्या विरूद्ध असल्याचे कायदे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.