

डोंबिवली : "डोंबिवलीच्या निवासी विभागातील बस स्टॉपचे रेलिंग रस्त्यावर" या मथळ्याखाली २४ ऑक्टोबर रोजी दैनिक पुढारीच्या अंकात सचित्र वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने दखल घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तुटलेले रेलिंग दुरूस्त करून पुन्हा बसविले. या स्टॉपशी संबंधित प्रवाशांनी दैनिक पुढारीचे आभार मानले आहेत.
एमआयडीसीच्या निवासी विभागातील कावेरी चौकात केडीएमटीचा बस स्टॉप आहे. बाजी प्रभू चौक ते निवासी विभाग या मार्गावर धावणाऱ्या बसेस सदर स्टॉपवर थांबतात. या स्टॉपचे समोरील रेलिंग रस्त्यावर आडवे पडले ते दिवसभर तसेच पडून होते. गेल्या काही दिवसांपासून हे रेलिंग हलत होते. लाद्या उखडून ते कोसळले. काही प्रवाशांनी बसच्या वाहक आणि चालकांना याची माहिती दिली. बस स्टॉपमधील बसण्याचे समोरील बाजूकडील संरक्षक स्टीलचे रेलिंग दिवसभर तसाच पडून होते. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन दैनिक पुढारीने सचित्र वृत्त प्रसारित करून केडीएमसीच्या परिवहन विभागाचे लक्ष वेधले.
रेलिंग/स्टीलचा संरक्षक भाग कोसळला तेव्हा सुदैवाने त्यावेळी कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. पुढारीच्या वृत्तानंतर केडीएमटीच्या ठेकेदाराने सदर रेलिंग दुरूस्तीसाठी उचलून नेले. हा बस स्टॉप वर्षभरापूर्वी नवीनच बांधला होता. त्यामुळे यासह अनेक ठिकाणी नवीन बांधलेल्या बस स्टॉपचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काही बस स्टॉप ठिकाणाच्या फरशा उखाडल्याचे दिसत आहेत.
दोन दिवसांपूर्वी सदर बस स्टॉपवरील रेलिंग/ स्टीलचा संरक्षक भाग हा पुन्हा बसविण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. दैनिक पुढारीने सचित्र वृत्त प्रसारित केल्यामुळे प्रशासनाला जाग आली. त्याबद्दल या स्टॉपशी संबंधित प्रवाशांसह या भागातील जागरूक रहिवासी तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे दैनिक पुढारीचे आभार मानले आहेत.