

डोंबिवली (ठाणे) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याणातील श्वान निर्बिजीकरण केंद्राची दुरवस्था झाली आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर गैरकारभार सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी श्वान निर्बिजीकरण केंद्राचे नियंत्रक बहुद्देशीय कर्मचारी आणि या केंद्रातील श्वानांच्या देखभालीचे काम करणाऱ्या पुण्यातील मे. जीवरक्षा ऑनिमल वेल्फेअर संस्थेला कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीतील भटक्या कुत्र्यांवरही अन्याय होत असल्याने उपलब्ध तक्रारींना अनुसरून प्रशासनाने कठोर कारवाईची पावले उचलली आहेत.
कल्याण पश्चिमेकडील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या श्वान निर्बिजीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात गैरकारभार आणि गैरव्यवहार सुरू असल्याच्या तक्रारी गेलेल्या अनेक वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीतील प्राणी मित्रांसह माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहेत. आतापर्यत गटारे, पायवाटा, प्रत्येक कामाच्या निविदेत टक्केवारीच्या मलाईसाठी जिभल्या चाटणारे बदमाश रस्त्यांवर भटकणाऱ्या श्वानांच्या नावे असलेल्या निधीतही मोठा हात मारत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. माहिती अधिकारी कार्यकतें मनोज कुलकर्णी यांनी श्वान नर्बिजीकरण, लसीकरण, नसबंदीसह या केंद्रातील सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती मागवली होती. सदर माहितीमधून या केद्रातील काही गैरकारभाराची माहिती उघडकीला आली. या माहितीच्या आधारे कुलकर्णी यांनी आरोग्य विभागाच्या प्रमुखांकडे तक्रार केली होती.
सदर निर्बिजीकरण केंद्रात दररोज जवळपास ४० श्वानांच्या शास्त्रक्रिया होत असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात येते. तथापि प्रत्यक्षात त्याचे सीसीटीव्ही फूटेज मात्र उपलब्ध नाही. या केद्रातील डॉक्टरांच्या नियुक्तीत देखिल घोळ आहे. केंद्रातील कर्मचाऱ्यांमधील ठराविक कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरणा केली जाते. ठेकेदार कंपनीचा ठेका मार्च २०२५ मध्ये संपला असताना त्यानंतरही या केद्रातील त्यांची लाखो रूपयांची देयके काढण्यात येतात. श्वानांना पकडण्याच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा देखिल नाही. त्यामुळे दररोज किती श्वान पकडले जातात याचा अंदाज बांधता येत नसल्याच्या अनेक तक्रारी मनोज कुलकर्णी यांनी केल्या आहेत.
तक्रारीच्या अनुषंगाने खुलासे करण्याचे आदेश
या तक्रारीच्चा अनुषंगाने उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी श्वान नर्बिजीकरण केंद्राच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील नियंत्रक बहुदेशीय कर्मचारी (एम. पी. डब्ल्यू) कमलेश सोनवणे, देखभाल करारी कंपनी मे. जीवर्षा ऑनिमल वेल्फेअर या सर्वांना नोटिस बजावली आहे. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने खुलासे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यातील कमलेश सोनवणे यांना प्रशासनाने निलंबनाची तंबी दिली आहे. अटी आणि शर्तीचे पालन केले नसल्याने ठेकेदार कंपनीला कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.