

डोंबिवली : स्वातंत्र्यदिनी मांसविक्री बंदीचा निर्णय घेणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात रणकंदन सुरू असतानाच राजकीय वळण लागलेल्या या निर्णयावर प्रशासन आजही ठाम असल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या केडीएमसीच्या मांस विक्री बंदीच्या निर्णयावर महापालिका प्रशासन कायम आहे. स्वातंत्र्यदिनी केवळ खाटीकखान्यांसह मांस विक्रीवर बंदी असून खाण्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध घालण्यात आले नसल्याचेही आयुक्तांनी उपस्थित प्रसार माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
केडीएमसी प्रशासनाने १५ ऑगस्टला खाटीकखान्यांसह मांसविक्री बंदीचा निर्णय जाहीर केल्यापासून या निर्णयाला वादाचे वळण लागले आहे. या निर्णयाचे राजकीय वर्तुळातही तीव्र पडसाद उमटत आहेत. केवळ कल्याण-डोंबिवलीमध्ये स्थानिक पातळीवरच नाही तर थेट राज्याच्या मंत्र्यांनीही त्यांची मते व्यक्त केल्याने हा वाद आणखीनच उफाळून आला आहे. तर कल्याण-डोंबिवलीमध्ये मांस-मटण विक्रेत्यांच्या संघटनांसह सत्ताधारी पक्ष वगळता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदी राजकीय पक्षांनीही महापालिकेच्या या निर्णयाविरोधात रान उठवले आहे. तसेच ही बंदी उठवली नाही तर केडीएमसी मुख्यालयाच्या बाहेर मांसविक्री करणार असल्याचा हिंदू खाटीक समाजाने निषेधाचा बॅनर लावून संताप व्यक्त केला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्व विरोध झुगारून प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांच्या साह्याने उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यात येईल, असाही इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
१९८८ सालापासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून १५ ऑगस्टच्या दिवशी मांस विक्री बंदीची अधिसूचना जारी करण्यात येत आहे. हा यंदाच्या वर्षी पहिल्यांदा काढलेला निर्णय नसल्याची बाबही केडीएमसी आयुक्तांनी निदर्शनास आणून दिली. पत्रकार परिषदेला आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त संजय जाधव, कांचन गायकवाड, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.