

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आय प्रभागाने बुधवारी 27 गावांतील बेकायदा अतिक्रमणांचा चुराडा करून टाकला. या कारवाईत टाटा नाका, दावडीसह कल्याण-शिळ महामार्गावरील 90 टपऱ्या आणि हातगाड्यांचा जेसीबीच्या साह्याने जागीच चुराडा केला. शिवाय या परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकानासमोर उभे केलेले शेड्स आणि पदपथ अडवून उभारलेले बाकडे, 25 कोंबड्यांचे खुराडे, अशी जवळपास 200 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.
आयुक्तांच्या निर्देशांनुसार आय प्रभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप, अतिक्रमण विरोधी पथकाचे अधीक्षक राजेंद्र साळुंखे, फेरीवाला हटाव पथकप्रमुख जनार्दन पवार, अमित गायकर यांच्यासह 15 हून अधिक कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात तोडकामाची कारवाई केली. बुधवारी सकाळी टाटा लाईनपासून सुरू झालेल्या या कारवाईदरम्यान दोन जेसीबीच्या साह्याने मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर, तसेच फुटपाथ अडवून लावलेल्या हातगाड्या व टपऱ्या जागीच तोडण्यात आल्या.
काही फेरीवाल्यांनी आपल्या टपऱ्या आणि हातगाड्या वाचविण्यासाठी धडपड केली. मात्र पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. यात अवजड टपऱ्या जेसीबीच्या साह्याने जागीच तोडून त्या खंबळपाड्यातील केडीएमसीच्या भंगार तळावर जमा करण्यात आल्या. टाटा लाईनपासून पथकाने दावडी गावापर्यंत कारवाई केली.
या कारवाईत फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यासह हातगाड्या आणि टपऱ्या तोडून त्याचे भंगार देखिल केले.अनेक दुकानदारांनी दुकानासमोर उभारलेले शेड्स काढून टाकण्यात आले. असे शेड्स पुन्हा उभारल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल,असे प्रशासनाने सांगितले आहे.