

कल्याण : केडीएमसीने पालिका क्षेत्रात 41 ठिकाणी क्लस्टर योजना राबविण्याचे ठरविले आहे. 27 गावात क्लस्टर योजना राबविण्यास 27 गावातील नागरीकांसह सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा तीव्र विरोध आहे. गावकऱ्यांचा विरोध न जुमानता महापालिकेने सक्तीने क्लस्टर योजना राबविल्यास रस्त्यावर उतरून 27 गावातील जनता आणि समिती तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला.
27 गावातील विविध प्रश्नावर चर्चा घडवून आण्याकरीता चर्चा तर होणारच हा कार्यक्रम 27 गावांमध्ये समितीच्या माध्यमातून घेतला जात आहे. प्रत्येक गावात जाऊन बैठक घेतली जात आहे. यापूर्वी 21 मार्च रोजी बैठक घेण्यात आली.
रविवारी कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील समाजमंदिर सभागृहात समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस सह सचिव सुमित वझे यांच्यासह पदाधिकारी सत्यवान म्हात्रे, रतन पाटील, मधूकर माळी, रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते.
27 गावातील जमीन मालक आणि शेकतरी यांच्या जमीनी कल्याण शीळ रस्ता, कल्याण बिझनेस सेंटर, कल्याण ग्रोथ सेंटर, बुलेट ट्रेन आदी विविध प्रकल्पात बाधित झालेल्या आहेत. आत्ता क्लस्टर योजनेमुळे 27 गावातील माणगाव, सोनारपाडा, भोपर, सागाव, दावडी, गेळवली, आडीवली, पिसवली, चिंचपाडा, पिसवली यांचा समावेश आहे. या गावातील भूमीपूत्रांच्या जमीनी क्लस्टर योजनेत बाधित होत आहे.
भूमिपुत्रांना भाडोत्री करण्याचा प्रयत्न
सहसचिव सुमित वझे यांनी सांगितले की, 27 गावातील जागा या भूमीपूत्रांच्या वडिलोपार्जित जागा आहे. या जागा क्लस्टर योजनेसाठी घेऊन त्याठिकाणी अत्यंत कमी आकाराचे घर दिले जाणार आहे. जमीन मालक असलेल्या भूमीपूत्रांच्या जागा योजनेसाठी घेऊन त्यांनाच भाडोत्री करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरु आहे. त्यामुळे क्लस्टर योजनेला आमचा तीव्र विरोध आहे. आमचा विरोध न जुमानता महापालिकेने सक्तीने क्लस्टर योजना राबविल्यास रस्त्यावर उतरून 27 गावातील जनता आणि समिती तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. प्रसंगी क्लस्टर योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल असे त्यांनी सांगितले.