

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील एका 24 वर्षीय महिला कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी देत शारीर सुखाची मागणीसाठी ब्लॅकमेल करणारा अस्थायी ठोकवेतनावरील लिपिक भूषण बाळीराम पाटील याच्याभोवती पोलिसांसह महापालिका प्रशासनाने देखिल फास करकचून आवळायला घेतला आहे. एकीकडे मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसरीकडे केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी या ब्लॅकमेलर लिपिकाला तडकाफडकी निलंबित केले आहे.
या संदर्भात आयुक्त अभिनव गोयल यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात 14 मार्च रोजी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 75, 79 व 352 अन्वये भूषण पाटील याच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीचा दाखला घेऊन त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील तरतूदीनुसार गुरूवारी निलंबनाची कारवाई केली. भूषण पाटील हा केडीएमसीच्या 10 / ई प्रभागक्षेत्र कार्यालयात अस्थायी ठोकवेतनावर लिपिक म्हणून काम करतो. त्याच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा व लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे. तसेच सदर घटनेची बातमी समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने महापालिकेची जनमानसातील प्रतीमा मलीन झाली आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता व गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाच्या प्रतिमेवर तसेच सेवाशिस्तीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सदर निलंबन नोटिशीत म्हटले आहे.
लिपिक भूषण पाटील याच्याविरूध्दच्या दाखल असलेल्या गुन्ह्याची सखोल चौकशी होण्यासाठी, कोणत्याही प्रकारचा पुरावा नष्ट न होण्यासाठी, तसेच साक्षीदारांवर दबाव न येण्यासाठी त्याला सेवेत ठेवणे हितावह नाही. त्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील तरतुदींनुसार लिपिक भूषण पाटील याला या आदेशान्वये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सेवेतून निलंबित करण्यात येत आहे.
निलंबन काळात त्याचे 1 /अ प्रभागक्षेत्र कार्यालय केडीएमसीचे मुख्यालय राहील. वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच निलंबित असताना खासगी नोकरी किंवा धंदा/व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. भूषण पाटील हा अस्थायी ठोकवेतनावर असल्याने त्याला निलंबन काळात निर्वाह भत्ता देय राहणार नाही. सदर आदेशाची नोंद संबंधीतांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी, असेही आयुक्त अभिनव गोयल यांनी सदर निलंबन नोटिशीत म्हटले आहे. आयुक्त अभिनव गोयल यांनी घेतलेल्या पावित्र्यामुळे केडीएमसीत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.