

नेवाळी : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यामधून जाणाऱ्या काटई कर्जत महामार्गाच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. नेवाळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत तयार झालेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना आग लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे कल्याण पूर्वेतील नागरिकांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. तर महामार्गालगत असलेल्या शाळा, नागरी वस्तीसह वाहनचालकांना देखील प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेतील नागरिकांचा नाक दाबून होणारा त्रासदायक प्रवास कधी सुखकर होणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील नेवाळी ग्रामपंचायत हद्दीत कचरा प्रश्न ज्वलंत झाला आहे. ग्रामपंचायत हद्दीत जागोजागी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. कचऱ्याचे ढिगारे दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांना आग लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना , लगतच्या नागरी वस्तीसह शाळांना त्रास सहन करावा लागत आहे.
या परिस्थितीकडे ठाणे जिल्हा परिषदेसह लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. नागरिकांना त्रासदायक ठरत असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट ग्रामपंचायत प्रशासन का लावत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी महामार्गावर प्रवेश केला आहे. मात्र दुर्लक्षित असलेल्या कल्याण पूर्वेतील श्री मलंगगड भागातील समस्यांकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने मतदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कचऱ्याचा प्रश्न गंभीर
सकाळच्या सुमारास नागरिकांची कामावर जाण्याची धावपळ, विद्यार्थ्यांची शाळेत आणि औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या वाहनांची महामार्गावरून ये जा सुरू असते. त्यामुळे डोंबिवली-अंबरनाथ महामार्गावरील प्रवास त्रासदायक ठरत असल्याने वाहनचालक सांगत आहेत. प्रशासकीय यंत्रणा नेवाळीतील कचऱ्याचा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या गंभीर समस्येकडे नेते कधी लक्ष देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.