

विरार ः वसई ते आर्नाळा या संवेदनशील किनारपट्टीवर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेले पहारे बुरुज (वॉच टॉवर) आजही उभारले गेलेले नाहीत. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मेहर यांनी या संदर्भात जानेवारी 2025 मध्ये महाराष्ट्र सागरी मंडळाकडे लेखी मागणी केली होती. मात्र, तब्बल आठ महिने उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी माहिती मिळते.
गेल्या काही महिन्यांत राजोडी बीचवर एका अज्ञात कंटेनरमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्याशिवाय वसई किनाऱ्यावरील भुईगाव, नवापूर, कालंब, राजोडी, केडी रोड, आणि शीतळ समुद्र परिसरात दररोज पर्यटकांची मोठी गर्दी होत असून, या धोकादायक किनाऱ्यांवर पोहण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांचे जीव धोक्यात येत आहेत. दर काही दिवसांनी बुडण्याच्या घटना घडत असल्याने, जिवरक्षकांना अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत काम करावे लागत आहे.
या सात ठिकाणीमिनी गोवा रिसॉर्ट कालंब, भुईगाव बीच, नवापूर स्मशानभूमी परिसर, काठेपाडा रोड, जेलाडी वातार, कालंब-राजोडी चार रस्ता आणि केडी कालंब रोड, शीतळ समुद्रपहारे बुरुज उभारण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागणीसंदर्भातील निविदा प्रक्रिया (टेंडर प्रक्रिया)च सुरू करण्यात आलेली नाही, असे मेहर यांनी सांगितले.
मेहर यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासन या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहशतवादी समुद्रमार्गे आले होते, आणि तोच मार्ग वसई किनाऱ्यालगत आहे. त्यामुळे हा किनारा सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील मानला जातो. अशा पार्श्वभूमीवर देखील सरकार व प्रशासन या भागात आवश्यक सुरक्षाविषयक पायाभूत सुविधा उभारण्यास गंभीर नाही, ही चिंताजनक बाब आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या निष्क्रियतेबद्दल नाराजी व्यक्त केली असून, लवकरच पहारे बुरुज उभारले नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या जीवितासाठी त्वरित उपाययोजना होणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
“या कामासाठी अद्याप मंजुरी प्राप्त झालेली नाही. अंदाजपत्रक तयार करण्यासाठी विषय पुढे पाठवण्यात येईल,
तुषार शेलवले, कनिष्ठ अभियंता