

मिरा रोड : काशिमीरा येथील निलकमल नाक्याजवळ गुरुवारी दुपारी सिमेंट काँक्रिटची वाहतूक करणार्या डंपरने एका 13 वर्षाच्या सनी राठोड या मुलाला धडक दिल्याने त्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असताना सायंकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर काशीमीरा येथील ग्रीन व्हिलेजसमोर नागरिकांनी शुक्रवारी सकाळी आरएमसी प्लांट बंद करण्यासाठी आंदोलन केले. या आंदोलनानंतर महापालिकेने फ्लांट बंद करण्यासाठी प्लांटला पत्र लाऊन तत्काळ प्लांट बंद करण्यात आला आहे.
काशीमीरा परिसरातील माशाचा पाडा या भागात मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रिट प्लांट सुरू आहेत. या प्लांटमधून काँक्रिट घेवून जाणारे डंपर भरधाव जात असतात. त्यामुळे यापूर्वी देखील अनेक अपघात घडले आहेत. अनेक वेळा या सिमेंट काँक्रिटच्या गाड्यांमधून रस्त्यांवर सिमेंट पडते. त्यामुळे दुचाकी चालक घसरून अपघात होतात.
याबाबत महापालिका व वाहतूक विभागाकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अपघात घडून एका निरागस मुलाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन केले. त्यानंतर महापालिका व पोलीस प्रशासन जागे झाले असून प्लांट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. काही महिन्यांपूर्वी नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर तीन आरएमसी फ्लांट बंद करण्याचे महापालिकेने पत्र दिले होते. परंतु त्यानंतर देखील रात्री प्लांटमधून गाड्या भरून जात असल्याचे नागरिक सांगत आहेत.
वाहतूक पोलिसांसमोर भरधाव डंपर जात असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी नागरिकांच्या अनेक तक्रारी नंतर तीन आरएमसी प्लांट बंद करण्याचे महापालिकेने पत्र दिले होते. परंतु त्यानंतर देखील रात्री प्लांटमधून गाड्या भरून जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. तसेच या सुरू असलेल्या प्लांटना नागरिकांचा विरोध असतानाही महापालिकेकडून नूतनीकरण करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी या भ्रष्ट अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर शहरातील सर्व आरएमसी प्लांट तत्काळ बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतरही महापालिका व पोलीस प्रशासनाकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी केलेली नाही. याच दुर्लक्षामुळे आज ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. काशीमीरा परिसरात सिमेंट काँक्रिटच्या गाड्यामुळे अनेक अपघात घडत आहेत.
गुरुवारी दुपारी नीलकमल नाका येथे सनी राठोड हा 13 वर्षाचा मुलगा शाळेतून घरी जात असताना डंपरने धडक दिली. या मुलाला खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. त्यावेळी नातेवाईकांनी रुग्णालया बाहेर ठिय्या मांडून बसले होते. पोलीस घटनास्थळी दाखल होत नातेवाईकांना समजावत त्यांना शांत केले. अपघात घडल्यानंतर मोठया संख्येने नागरिक जमा झाले होते. त्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन केले.
नागरिक आक्रमक
काही वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाहतूक खुली करून डंपर चालकाला ताब्यात घेत काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास ग्रीन व्हिलेज परिसरात रस्त्यावर बसत लोकांनी आरएमसी प्लांट बंद करण्याची मागणी केली. मोठ्या प्रमाणात घोषणा बाजी करण्यात आली. त्यानंतर देखील आंदोलनाच्या वेळी आरएमसी ट्रक येत जात असताना दिसून आल्याने आंदोलन करणार्या नागरिकांनी आक्रमक होत आंदोलन सुरू असतानाही गाड्या येत असल्याने रोष व्यक्त केला.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित होते. त्यानंतर मिरा भाईंदर महानगरपालिका अतिक्रमण प्रमुख नरेंद्र चव्हाण यांनी आंदोलन कर्त्याशी संपर्क साधत काशिमीरा परिसरात सुरू असलेले आरएमसी प्लांट आज सील करण्यात येतील असे आश्वासन दिले. त्यानंतर महापालिकेने दुपारी आंदोलनकर्त्याना पत्र दिले. तसेच तत्काळ प्लांट बंद करण्यासाठी पत्र दिले असून तत्काळ प्लांट बंद करण्यात यावा अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे महापालिका अधिकार्यांनी सांगितले.