

सापाड : योगेश गोडे
कल्याण शहरात पुन्हा एकदा विकासकांच्या दादागिरीचे प्रकरण उघडकीस आले असून विकासकाने शेतकर्याच्या सातबारा जमिनीवरील जागेवर जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. शेतकरी जागा विकण्यास नकार देत असल्याने विकासकाने महापालिका अधिकारी व पोलीस प्रशासनाला हाताशी धरून शेतकर्याच्या सातबारा जागेवरील उदरनिर्वाहाचे साधन असणार्या दुकानाची जबरदस्तीने तोडफोड घडवून आणली.
कल्याण पश्चिम गांधारी गावातील पीडित शेतकरी कृष्णा गजानन भंडारी यांच्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित जागेवर पालिकेचे अधिकारी हातोडा घेऊन पोहोचले, मात्र कोणतीही नोटीस न देता ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान महिलांशी धक्काबुक्की झाली व लाखोंचे नुकसानही झाले. इतकेच नव्हे तर महिलेला मारहाण झाल्याचे आरोप शेतकरी कुटुंबाने केले आहेत.
याप्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी भंडारी कुटुंब पोलीस ठाण्यात गेले असता, पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. तुम्ही तक्रार दिलीत तर विकासकदेखील तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करून क्रॉस-कंप्लेंट होईल, असा दम देत पोलिसांनी शेतकर्यांना परावृत्त केले असल्याचा गंभीर आरोप शेतकर्यांकडून करण्यात आला आहे.
विकासक जबरदस्तीने जागेचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे शेतकर्यांनी जागा वाचवण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. याबाबत महापालिका अधिकार्यांशी संपर्क केला असता यावेळी संपर्क होऊ शकला नाही. कल्याण डोेंबिवलीत जमिनी लाटण्याचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. दुसर्या बाजूला बेकायदा बांधकामांची प्रकरणेही पुढे आली असून पैसे देऊ नही बेघर होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
आमची ही क्लियर सातबाराची वडीलोपार्जित मिळकत आहे. या जागेवर छोटसं दुकान टाकून आमच्या संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह सुरू होता. विकासकाने आमच्या जागेला लागून काही जागा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी विकत घेतली आहे. मात्र आमच्या या जागेमुळे विकासकाच्या प्रोजेक्टला महत्व प्राप्त होणार असल्याने विकासक जबरदस्तीने जागा विकण्यासाठी प्रयत्न करत आहे. आम्ही जागा विकत नाही म्हणून विकासकाने जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
कृष्णा गजानन भंडारी, पीडित शेतकरी
विकासकामे आमच्या जागेवर जोर जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही परिवारासोबत आत्मदहन करू. विकासकाला मदत करण्यासाठी जोर जबरदस्ती करायला लावणार्या महापालिका अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या विरोधात आंदोलनाच्या पडसादाचे खापर फोडू.
राम भंडारी, कुटुंबीय
आमच्या सातबाराच्या जमिनीवर सुरू असलेल्या दुकानातून आमचा उदरनिर्वाह सुरू होता, मात्र महापालिका प्रशासनाने कोणतीही नोटीस न बजावता तडका फडकी कारवाई करून आमच्या उदरनिर्वाहाच्या साधनावर झाला घातला. त्यामुळे आता आमच्यावर येणारी उपासमारीची वेळ आम्ही कसे निभावून देणार, हा मोठा प्रश्न आम्हा भंडारी कुटुंबीयांच्या समोर उभा आहे. या संपूर्ण प्रकरणात आयुक्तांनी आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही आंदोलनाच्या भूमिकेत आहोत.
चेतन भंडारी, शेतकरी कुटुंबीय